Pune Metro : पुणेकरांना मिळणार 2 नवीन मेट्रो स्थानके,सरकारकडून 683 कोटींची मंजुरी
(Pune Metro) पुणेकरांसाठी सार्वजनिक वाहतुकीच्या सुविधांमध्ये मोठी सुधारणा होणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याला महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. स्वारगेट ते कात्रज या मेट्रो कॉरिडॉरवर दोन नवीन स्थानके उभारण्यास तत्त्वत: मंजुरी मिळाली आहे. बालाजीनगर आणि बिबवेवाडी येथे ही स्थानके बांधण्यात येणार असून त्यासाठी 683.11 कोटी रुपयांचा अतिरिक्त खर्च राज्य सरकारने मंजूर केला आहे.
या निर्णयामुळे पुण्याच्या दक्षिण भागातील नागरिकांना मेट्रो प्रवास अधिक सोयीस्कर होणार असून, रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासही मोठी मदत होईल. या प्रकल्पात पुणे महानगरपालिकेचा 227.42 कोटी रुपयांचा वाटा असून, युरोपियन इन्व्हेस्टमेंट बँकेकडून 341.13 कोटी रुपयांचे कर्ज मिळणार आहे. याशिवाय राज्य शासनाचे दुय्यम कर्ज व व्याजरहित कर्ज यांचा मिळून एकूण खर्च 683.11 कोटी इतका होणार आहे.
या दोन स्थानकांमुळे मेट्रो टप्पा-2 अधिक कार्यक्षम होणार असून नागरिकांना आधुनिक, जलद आणि पर्यावरणपूरक प्रवासाचा लाभ मिळेल. तसेच कात्रज स्थानकाचे दक्षिणेकडे सुमारे 421 मीटरने स्थलांतरण करण्यासही मंजुरी देण्यात आली आहे.
दरम्यान, बैठकीत पुणे, ठाणे आणि नागपूर येथील विविध मेट्रो प्रकल्पांच्या कर्ज करारनाम्यांनाही मंजुरी देण्यात आली. या निर्णयामुळे महाराष्ट्रातील अनेक शहरांमधील मेट्रो प्रकल्पांना गती मिळणार आहे.