Punit Balan Group
Punit Balan Group

Punit Balan Group : 'पुनीत बालन ग्रुप’कडून आषाढी वारीतील 8 हजार पोलिसांना जीवनावश्यक वस्तूंचे किट

पंढरपूरमध्ये आषाढी वारीच्या कालावधीत बंदोबस्तासाठी येणारे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासाठी 'पुनीत बालन ग्रुप’कडून जीवनावश्यक वस्तूंचे आठ हजार किट देण्यात आले आहेत.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

( Punit Balan Group ) पंढरपूरमध्ये आषाढी वारीच्या कालावधीत बंदोबस्तासाठी येणारे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासाठी 'पुनीत बालन ग्रुप’कडून जीवनावश्यक वस्तूंचे आठ हजार किट देण्यात आले आहेत. यामध्ये 6 हजार पुरुष तर 2 हजार महिला पोलीस कर्मचाऱ्यांच्या किटचा समावेश आहे. या किटमध्ये दैनंदिन गरजेच्या वस्तूंचा समावेश असल्याने वारीच्या बंदोबस्ताच्या कालावधीतील पोलीस बांधवाची गैरसोय टळणार आहे आणि परिणामी त्यांना चांगली सेवा देता येणार आहे.

आषाढी एकादशीच्या निमित्ताने दरवर्षी संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज यांच्यासह अन्य संतांच्या पालखी समवेत लाखो वारकरी पंढरपुरमध्ये दर्शनासाठी येत असतात. यावर्षी येत्या 6 जुलैला आषाढी वारी सोहळा आहे. त्यामुळे लाखो वारकऱ्यांसह दर्शनासाठी येणाऱ्या महत्वाच्या आणि अति महत्वाच्या व्यक्तींसाठी सहा हजार पुरुष कर्मचारी आणि दोन हजार महिला कर्मचारी असे जवळपास आठ हजार पोलीस अधिकारी आणि कर्मचारी बंदोबस्तासाठी असणार आहेत.

आषाढी वारी सोहळ्याच्या आठ दिवस हे सर्व अधिकारी कर्मचारी पंढरपुरमध्ये मुक्कामी असणार आहेत. त्यामुळे या सर्वांसाठी दैनंदिन वापराच्या जीवनावश्यक वस्तूंचे किट बॅगेसह उपलब्ध करून देण्यात यावे अशी मागणी पंढरपुरचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. अर्जुन भोसले यांनी युवा उद्योजक पुनीत बालन यांच्याकडे पत्राद्वारे केली होती. त्यानुसार बालन यांनी तत्काळ हे किट उपलब्ध करून दिले आहेत. पंढरपूरचे पोलीस उपनिरीक्षक महादेव पिसाळ यांच्याकडे हे किट देणयात आले असून याच्याआधीही ‘पुनीत बालन ग्रुप’च्या माध्यमातून हे किट देण्यात आले होते.

किटमधील वस्तू

कोलगेट पाऊच, पॅराशूट तेल बॉटल, ओडोमास, ग्लुकोज, डेटॉल साबण, शेंगदाणा चिक्की, मास्क, पाणी बॉटल आणि महिला पोलीस कर्मचाऱ्यांसाठी सॅनिटरी पॅड

याच पार्श्वभूमीवर पुनीत बालन म्हणाले की, "उन, वारा, पाऊस यांची तमा न करता विठ्ठलाच्या दर्शनासाठी येणाऱ्या वारकऱ्यांची सुरक्षा व्यवस्था राखण्याचं महत्त्वाचं आणि अत्यंत जोखमीचं काम हे पोलीस बांधव करत असतात. त्यामुळे त्यांची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी पोलिसांच्या मागणीनुसार दैनंदिन वस्तूंचे किट देण्यात आले आहे. या माध्यमातून वारकऱ्यांच्या सेवेत खारीचा वाटा उचलण्याचं भाग्य आम्हाला मिळालं, याचं समाधान आहे."

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com