Pune News : पुण्यात बॉम्ब ठेवल्याची धमकी! पुण्यात 3 ठिकाणी सुरक्षा वाढवली
पुण्यातून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. पुणे शहरातील येरवडा, पुणे स्टेशन आणि भोसरी या तीन ठिकाणी बॉम्ब ठेवण्यात आल्याची धमकी मिळाल्याने खळबळ माजली आहे. यासंदर्भात आज सकाळी अंदाजे 9 वाजता पुणे पोलिसांच्या आपत्कालीन क्रमांकावर हा धमकीचा फोन आला.
या फोननंतर पुणे पोलिस आणि रेल्वे पोलिसांनी तात्काळ कारवाई सुरू केली असून संबंधित ठिकाणी तपास आणि शोधमोहीम राबवण्यात येत आहे. धमकी कोणाकडून आली, याचा तपास सुरू असून यामागचा हेतू काय आहे, हे स्पष्ट होणे बाकी आहे. या घटनेमुळे पुणे शहरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांनी शांतता आणि सहकार्य करण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे.
या पार्श्वभूमीवर सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या असून संबंधित ठिकाणी बॉम्ब शोध पथक, डॉग स्क्वॉड आणि स्थानिक पोलिस दलाचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. दरम्यान, पोलिसांकडून नागरिकांना कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीचीच प्रतीक्षा ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत करण्यात आली असून संपूर्ण तपास जलदगतीने सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.