Pune : पुणे पुस्तक महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर वाहतुकीत तात्पुरते बदल, पर्यायी मार्ग कोणता?
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
अमोल धर्माधिकारी, पुणे
(Pune) पुणे, फर्ग्युसन कॉलेज मैदानावर आजपासून ते 21 डिसेंबर दरम्यान होणाऱ्या पुणे राष्ट्रीय पुस्तक महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर फर्ग्युसन रस्त्यावरील वाहतुकीत तात्पुरता बदल करण्यात आला आहे. पुणे पुस्तक महोत्सवासाठी व्ही.आय.पी. व्यक्ती, विद्यार्थ्यांबरोबर शहरातील नागरिक मिळून अंदाजे नऊ ते १० लाख जणांची हजेरी अपेक्षित आहे.
मोठ्या प्रमाणात गर्दी होणार असल्याने डेक्कन वाहतूक विभागाने वाहतुकीस तात्पुरते बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. महोत्सव काळात सकाळी नऊपासून रात्री १० वाजेपर्यंत जंगली महाराज रस्ता व फर्ग्युसन कॉलेज रस्त्यावरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आवश्यकतेनुसार वाहतुकीत बदल केला जाईल.
पर्यायी मार्ग:
- जंगली महाराज रोडने कर्वे रोडकडे जाणारे वाहन बालगंधर्वकडे वळून, नदीपात्र रोड व महादेव मंदिर मार्गे इच्छित स्थळी जाईल.
- कर्वे रोडकडून एफ.सी. कॉलेज रोडने शिवाजीनगरकडे जाण्यासाठी कर्वे रोड नळस्टॉप, लॉ कॉलेज रोड व सेनापती बापट रोड मार्गे वाहन नेले जाईल.
पार्किंग व प्रवेश मार्ग:
- पुस्तक महोत्सवासाठी येणाऱ्या नागरिकांसाठी एफ.सी. कॉलेज गेट नं. ३ (संत तुकाराम महाराज पादुका चौक) द्वारे दुचाकी, चारचाकी आणि बससह सर्व वाहनांना एफ.सी. कॉलेज पार्किंग ग्राऊंडमध्ये प्रवेश मिळेल.
- बाहेर जाण्यासाठी नागरिकांनी एफ.सी. कॉलेज गेट नं. ४ वापरावे.
- फक्त पायी जाणाऱ्या नागरिकांसाठी एफ.सी. कॉलेज गेट नं. २ खुला राहील.
- बी.एम.सी.सी. कॉलेज तसेच गेट नं. २ समोरील पुणे महापालिका वाहनतळ येथे चारचाकी व दुचाकी वाहनांसाठी विनाशुल्क पार्किंग सुविधा उपलब्ध असेल.
