Rajgad Fort : बालेकिल्ल्यावरून उतरताना 150 फूट दरीत कोसळून महिलेचा मृत्यू
(Rajgad Fort ) पतीसोबत पर्यटनासाठी राजगड किल्ल्यावर आलेल्या महिलेचा बालेकिल्ल्यावरून उतरतानाचा तोल जाऊन सुमारे 150 फूट खाली कोसळून मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी (5 जून) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली.
मृत महिलेचे नाव कोमल सतीश शिंदे असून त्या आळंदी (ता. खेड, पुणे) येथील रहिवासी होत्या. वेल्हे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोमल या आपल्या पतीसह राजगड किल्ल्याला भेट देण्यासाठी आल्या होत्या. किल्ल्याच्या बालेकिल्ल्याची पाहणी करून उतरताना कोमल यांचा तोल जाऊन त्या दरीत कोसळल्या.
घटनेची माहिती मिळताच पोलीस जवान युवराज सोमवंशी आणि आपत्ती व्यवस्थापन पथकातील तानाजी भोसले, गणेश सपकाळ, संजय चोरघे, निलेश जाधव, संदीप सोळसकर आणि सनी माने यांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह खाली आणण्यासाठी मदत केली. दुपारच्या सुमारास पडलेल्या पावसामुळे रस्ता निसरडा झाल्यामुळे मृतदेह खाली आणताना अडथळे निर्माण झाले. शेवटी रात्री साडेअकराच्या सुमारास वेल्हे ग्रामीण रुग्णालयात डॉक्टरांनी कोमल यांना उपचारांपूर्वीच मृत घोषित केले. या घटनेचा पुढील तपास वेल्हे पोलीस करीत आहेत.
या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, पर्यटनस्थळी सुरक्षिततेच्या उपाययोजनांबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. पावसाळ्याच्या दिवसांत डोंगराळ भागात फिरताना पर्यटकांनी अधिक काळजी घेणे आवश्यक आहे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.