Accident : मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर 8 वाहनांचा विचित्र अपघात; कैद्यांना घेऊन जाणाऱ्या वाहनाला जोरदार धडक, 12 पोलीस जखमी
(Accident) मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर काल सकाळी भीषण अपघात झाला. तब्बल आठ वाहने एकमेकांवर आदळल्यामुळे परिसरात मोठी वाहतूक कोंडी झाली. या अपघातात कैद्यांना घेऊन जाणारी पोलिसांची व्हॅनही सामील होती. या दुर्घटनेत 10 ते 12 पोलीस जखमी झाले असून, त्यांच्यावर पनवेल येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, ही गाडी कैद्यांसह मुंबईहून पुण्याच्या दिशेने निघाली होती. जखमी पोलिसांपैकी काहींची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. विशेष म्हणजे, या गाडीत काही बांगलादेशी कैद्यांनाही नेले जात होते, अशी माहिती समोर आली आहे.
अपघातात पोलिसांच्या 5 ते 6 गाड्या, एक टेम्पो, एक पोलिसांची जीप आणि महामंडळाची एक बस यांचा समावेश होता. अनेक वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी, वाहनांच्या अतिवेगामुळे हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.
अपघातामुळे द्रुतगती मार्गावर काही काळ वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. घटनास्थळी पोलीस आणि आपत्कालीन सेवांचे पथक दाखल झाले होते. दरम्यान, अपघाताचे नेमके कारण समजून घेण्यासाठी पोलिसांनी सीसीटीव्ही फूटेज तपासण्यास सुरुवात केली आहे.