New Rules For Mantralaya Entry : मंत्रालय प्रवेश पास काढण्याची जुनी पद्धत बंद होणार; ऑनलाईन ॲप नोंदणीद्वारेच प्रवेश करता येणार
(New Rules For Mantralaya Entry) मंत्रालयातील वाढती गर्दी टाळण्यासाठी आता प्रवेशप्रक्रियेत महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. 15 ऑगस्टपासून मंत्रालयात प्रवेश केवळ ‘डीजी प्रवेश’ ॲपवर नोंदणी केलेल्यांनाच मिळणार आहे. या ॲपमधून चेहरा पडताळणीची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतरच अधिकारी, कर्मचारी, पत्रकार आणि अभ्यागतांना प्रवेश दिला जाईल.
सामान्य प्रशासन विभागाने मंत्रालयात अनावश्यक गर्दी रोखण्यासाठी आधीच चेहरा पडताळणी यंत्रणा आणि ऑनलाइन नोंदणीची सुविधा सुरू केली होती. मात्र, स्मार्टफोन नसलेले किंवा ॲप वापरण्यास अडचण असलेले ग्रामीण भागातील लोक यासाठी प्रवेशद्वाराजवळच्या खिडकीतून कागदी प्रवेशपत्र घेत होते. दुपारनंतर या खिडक्यांवर मोठ्या रांगा लागत होत्या.
आता ही ऑफलाइन सुविधा पूर्णपणे बंद करण्यात येणार असून, मंत्रालयात प्रवेशासाठी ‘डीजी प्रवेश’ ॲप मोबाईलमध्ये डाउनलोड करून दहा अंकी मोबाईल क्रमांकासह नोंदणी करणे बंधनकारक असेल. गृह विभागाचे उपसचिव चेतन निकम यांनी सांगितले की, स्मार्टफोन नसलेल्या व्यक्तींसाठी पर्यायी कार्यप्रणाली विकसित करण्याचे काम सुरू आहे, ज्यामुळे कोणाचीही गैरसोय होणार नाही.
यापूर्वी मंत्रिमंडळ बैठकीच्या वेळी किंवा मोठ्या कार्यक्रमांच्या दिवशी मंत्रालयात प्रवेशासाठी लांबच लांब रांगा लागत असत. या नव्या पद्धतीमुळे गर्दी नियंत्रणात येईल असा प्रशासनाचा विश्वास आहे.