Maharashtra Weather : अरबी समुद्र खवळण्याची शक्यता; मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा
( Maharashtra Rain Update )राज्याच्या विविध भागात मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. उन्हाचा कडाका वाढला आहे. उकाड्याने नागरिक हैराण झाले आहेत. काल मान्सूनपूर्व पावसानं मुंबईला चांगलेच झोडपलं. राज्यात सर्वत्र मान्सूनपूर्व जोरदार पावसाने हजेरी लावली आहे
मुंबई, ठाणेसह कोकणाला पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला असून आजपासून पुढील 5 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यामुळे 25 तारखेपर्यंत मुंबईसह कोकण विभागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे
यातच आता अरबी समुद्र खवळण्याची शक्यता असून, मच्छिमारांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. महाराष्ट्र आणि गोव्या जवळ अरबी समुद्रात 21 मेपासून कमी दाबाचा पट्टा तयार होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री कार्यालयाकडून ट्विट करत सांगण्यात आले आहे की, अरबी समुद्र खवळण्याची शक्यता; मच्छीमारांना सतर्कतेचं आवाहन. महाराष्ट्र आणि गोव्या जवळ अरबी समुद्रात 21 मेपासून कमी दाबाचा पट्टा तयार होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. 24 मेपर्यंत तो अधिक तीव्र होऊन उत्तरेकडे सरकू शकतो. राज्याच्या किनाऱ्याला थेट धोका नसला तरी याचा परिणाम म्हणून समुद्र खवळलेला राहण्याची शक्यता आहे.
22 ते 24 मे दरम्यान रायगड, रत्नागिरी, मुंबई आणि पालघरजवळ समुद्र खवळू शकतो, तर खोल समुद्रात जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे मासेमाऱ्यांनी हवामान बदलांवर लक्ष ठेवून या काळात खोल समुद्रात जाणे टाळावे, असा इशारा आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिला आहे.
21 ते 24 मे दरम्यान मच्छीमारांनी घ्यावयाची सावधगिरी
हवामान खात्याच्या अपडेट्स नियमितपणे तपासत राहावेत.
स्थानिक प्रशासन व मच्छीमार सहकारी संस्थांकडून मिळणाऱ्या सूचनांचे पालन करावे.
खोल समुद्रात मासेमारीसाठी जाणे पूर्णतः टाळावे.
लहान बोटींचा वापर टाळावा, किनाऱ्यालगतच कार्य करावे.
सुरक्षेसाठी आवश्यक ती साधने (लाईफ जॅकेट्स, वायरलेस सेट) जवळ बाळगावीत.
संभाव्य वाऱ्याचा वेग व लाटांचा जोर लक्षात घेऊन किनाऱ्यावरील होड्या व बोटी सुरक्षित स्थळी हलवाव्यात.
समुद्र खवळलेला असताना मासेमारी टाळून स्वतःची व इतरांची सुरक्षितता जपावी.