Malad : हस्ताक्षर खराब असल्याने संतापलेल्या शिक्षिकेने 8 वर्षांच्या मुलाला दिली 'ही' शिक्षा; वाचून धक्का बसेल
(Malad) मालाडमध्ये धक्कादायक प्रकार घडला आहे. मालाडमधील खासगी शिकवणी घेणाऱ्या शिक्षिकेने आठ वर्षाच्या मुलाला शिक्षा दिली आहे. हस्तारक्ष खराब असल्यामुळे शिक्षिकेने आठ वर्षांच्या मुलाचा हात पेटत्या मेणबत्तीवर धरून चटके दिल्याची घटना घडली आहे.
तक्रारदार मालाड (पूर्व) येथील पिंपरीपाडा येथे राहतात. हा मुलगा इयत्ता तिसरीत शिकतो. मालाड (पूर्व) येथील गोकुलधाममधील जेपी डेक्स इमारतीतील राजश्री राठोड यांच्याकडे शिकवणीसाठी जात होता. संध्याकाळी ७ ते ९ असे दोन तास हे शिकवणीचे वर्ग चालत असल्याची माहिती मिळत आहे.
25 तारीखला नेहमीप्रमाणे तो मुलगा शिकवणीला गेला. त्यानंतर त्या शिक्षिकेने नऊ वाजता हमजाचे वडील मुस्तकीन खान यांना फोन केला आणि हमजा खूप रडत असल्याने त्याला घरी घेऊन जाण्यास सांगितले. हमजाची मोठी बहिण रूबीना त्याला घेण्यासाठी आली असता त्याच्या उजव्या हातावर भाजल्याचा गंभीर जखमा दिसल्या रूबिनाने याबाबत शिक्षिका जयश्री राठोड यांना विचारले, तेव्हा तिने नीट उत्तरं दिली नाही.
घरी परतल्यावर हमजाने वडिलांना सर्व प्रकार सांगितला. याबाबत त्याच्या वडिलांनी राठोड यांच्याकडे विचारणा केली. त्यावर मुलांना शिस्त लावण्यासाठी हे केल्याचे सांगितले. या प्रकरणी खान यांनी कुरार गाव पोलीस ठाण्यात जयश्री राठोड विरोधात तक्रार दाखल केली असून त्या शिक्षिकेविरोधात आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.