Mumbai Monorail : मुंबईतील मोनोरेल पुन्हा ठप्प; महिन्याभरात तिसऱ्यांदा बिघाड
थोडक्यात
वडाळा परिसरात मोनो रेल विस्कळीत
तांत्रिक कारणामुळे मोनो रेलमध्ये बिघाड
बंद पडलेल्या मोनोरेलमधून प्रवाशांना काढलं बाहेर
(Mumbai Monorail) मुंबईत मुसळधार पावसाने वाहतुकीची कोंडी केली असून रेल्वेप्रमाणेच मोनोरेल सेवेलाही याचा फटका बसला आहे. सोमवारी सकाळी वडाळा मार्गावर धावणारी मोनोरेल अचानक बंद पडल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय झाली.
मध्यरात्रीपासून शहरात आणि उपनगरांत पावसाने जोर धरला होता. सकाळी कामावर जाण्याच्या गर्दीच्या वेळी मोनोरेल बंद पडल्याने प्रवाशांना गाडीतून बाहेर काढण्यात आलं. नंतर त्यांना दुसऱ्या मोनोरेलमध्ये शिफ्ट करण्यात आलं. बंद पडलेली गाडी कपलिंग करून कारशेडमध्ये नेण्यात आली असून तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्याचं काम सुरू आहे.
मुंबई मोनोरेलमध्ये गेल्या महिन्याभरात हा तिसरा मोठा बिघाड आहे. यापूर्वीही दोन वेळा अचानक सेवा ठप्प झाल्याने प्रवाशांना प्रवासात अडथळा आला होता. या वारंवार होणाऱ्या बिघाडांमुळे प्रवाशांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.
मोनोरेल ही मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची पर्यायी वाहतूक व्यवस्था मानली जाते. मात्र सततच्या तांत्रिक अडचणींमुळे तिचं नियोजन आणि देखभाल यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. पावसाळ्यात अशा प्रकारचे अडथळे टाळण्यासाठी प्रशासनाने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.