Mumbai Police : मुंबई पोलिसांना लवकरच मिळणार डिजिटल ओळखपत्र
(Mumbai Police ) मुंबई पोलिसांना आता लवकरच डिजिटल ओळखपत्र मिळणार आहे. बनावट ओळखपत्रांना आळा घालण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती मिळत आहे. मुंबई पोलीस दलात कार्यरत असलेल्या पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना सध्या छापील ओळखपत्र दिले जाते. याचे बनावट ओळखपत्राची नक्कल करून बनावट ओळखपत्र तयार करणे सहज शक्य होते. यावरुन लोकांची फसवणूक देखील केली जाते.
गुन्हेगारी कारवायांना प्रतिबंध घालण्यासाठी मुंबई पोलीस आस्थापनेवर काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना तंत्रज्ञानयुक्त ओळखपत्र देण्याचा प्रस्ताव मुंबई पोलीस आयुक्तांनी गृह विभागाला सादर केला होता. या प्रस्तावाला आता मान्यता देण्यात आली आहे.
बनावट ओळखपत्राद्वारे पोलीस असल्याचे भासवून नागरिकांची फसवणूक करण्यात येत असल्याने असे प्रकार थांबवण्यासाठी गृह विभागाने आता मुंबई पोलीस दलातील अधिकारी कर्मचाऱ्यांना डिजिटल ओळखपत्र देण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी चार कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकास गृह खात्याने मंजुरी दिली आहे.