Mumbai University Exams Postponed : मुसळधार पावसामुळे मुंबई विद्यापीठाने आजच्या परीक्षा पुढे ढकलल्या
(Mumbai University Exams Postponed) राज्यात कोसळणाऱ्या मुसळधार पावसाचा फटका शिक्षण क्षेत्रालाही बसला आहे. मुंबई विद्यापीठाने आपल्या संलग्न सर्व महाविद्यालये, शैक्षणिक संस्था तसेच दूरस्थ आणि ऑनलाईन शिक्षण केंद्राच्या (सीडीओई) आज, मंगळवारी (19 ऑगस्ट) होणाऱ्या सर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली होती. त्यानुसार विद्यापीठाने देखील नियोजित परीक्षा पुढे ढकलत विद्यार्थ्यांना दिलासा दिला आहे.
विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालक डॉ. पूजा रौंदळे यांनी जारी केलेल्या परिपत्रकानुसार या परीक्षा आता 23 ऑगस्ट रोजी घेण्यात येणार आहेत. विद्यार्थ्यांनी अद्ययावत वेळापत्रकासाठी विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळावर लक्ष ठेवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, हवामान खात्याने मुंबई आणि कोकण विभागासाठी रेड अलर्ट जारी केला आहे. बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र गुजरातकडे सरकत असून त्याचा परिणाम मुंबई आणि परिसरावर होत आहे. त्यामुळे मंगळवारीही मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.