Mumbai One App : मेट्रो, बस, मोनोरेल आणि लोकल प्रवासासाठी आता एकच तिकीट; पंतप्रधान मोदींच्या हस्ते 'Mumbai One App' लॉन्च
थोडक्यात
मुंबईकरांसाठी एक मोठी दिलासादायक बातमी
मेट्रो, बस, मोनोरेल आणि लोकल प्रवासासाठी आता एकच तिकीट
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते Mumbai One App लॉन्च
Mumbai One App : मुंबईकरांसाठी एक मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. काल ८ ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ‘Mumbai OneTicket’ या नव्या डिजिटल मोबिलिटी अॅप लॉन्च करण्यात आला. या अॅपमुळे आता मुंबईत प्रवास करणाऱ्या नागरिकांना बस, लोकल ट्रेन, मेट्रो, मोनोरेल आणि नवी मुंबई मेट्रो यासाठी वेगवेगळी तिकीटं घ्यावी लागणार नाहीत. एकाच अॅपवरून एकच QR कोड तिकीट काढून या सगळ्या वाहतूक सेवांचा वापर करता येणार आहे.
‘Mumbai OneTicket’ अॅप ओपन नेटवर्क फॉर डिजिटल कॉमर्स (ONDC) या राष्ट्रीय डिजिटल प्लॅटफॉर्मवर आधारित असून, यामध्ये मुंबई मेट्रोच्या लाईन 1, 2A, 3 आणि 7, मोनोरेल, नवी मुंबई मेट्रो, मुंबई लोकल आणि विविध महानगरपालिकांच्या बस सेवा समाविष्ट आहेत. प्रवाशांनी Google Play Store किंवा Apple App Store वरून अॅप डाउनलोड करून साइन-अप करायचं, प्रवासाचं ठिकाण निवडायचं, पेमेंट केल्यानंतर मिळालेला QR कोड मेट्रो किंवा बस गेटवर स्कॅन केला की प्रवास सुरू.
या अॅपमध्ये रिअल-टाईम ट्रॅफिक अपडेट्स, पर्यायी मार्ग, नकाशा आणि आपत्कालीन SOS सुविधा देखील देण्यात आल्या आहेत. ‘Mumbai OneTicket’ अॅपमुळे मुंबईतील प्रवास आणखी सुलभ, डिजिटल होणार असून, नागरिकांचा वेळ वाचणार आहे.