चांगली बातमी ;होळीसाठी कोकणवासींयासाठी १०० जादा बसेस
कोकणवासीयांसाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. कोकणात होळीसाठी (Holi) जाणाऱ्या प्रवाशांकडून जर कोणी अवास्तव भाडे आकरत असेल तर कारवाई करण्याचा निर्णय आज विधिमंडळात परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांनी घेतला आहे. तसेच मुंबईहून (Mumbai) नियमित बसेस व्यतिरिक्त १०० जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
होळीनिमित्त (Holi)कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची गैरसोय होऊ नये यासाठी एसटी महामंडळाने नियमित बसेस व्यतिरिक्त १०० जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. १६ ते २७ मार्च २०२२ दरम्यान या गाड्या कोकणातील मार्गावरून धावणार आहेत, अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड. अनिल परब यांनी दिली. दरम्यान, सुरक्षित प्रवासासाठी प्रवाशांनी एसटीच्या बसेसमधून प्रवास करावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
गणेशोत्सवाबरोबरच होळीचा सणही कोकणात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या सणासाठी मुंबईहून लाखो चाकरमानी कोकणातील आपापल्या गावी जात असतात. त्यामुळे या सणाच्या काळात प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते. अशा प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी एसटी सज्ज झाली असून महामंडळाने यंदा १०० जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई सेंट्रल, परळ, कुर्ला, बोरिवली, ठाणे, वसई, नालासोपारा तसेच पनवेल येथील आगारांतून खेड, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, सावंतवाडी आदी भागात या जादा बसेस सोडण्यात येणार आहेत. जादा बसेस सोडण्यासाठी वाहतूक विभागाने पूर्ण तयारी केली असून पुणे, सातारा, सांगली आदी भागातून जादा बसेस मागविण्यात आल्या आहेत. तसेच गाड्यांचे नियोजन करण्यासाठी आगारांत एसटीचे अधिकारी व पर्यवेक्षक यांची नेमणूक करण्यात आली आहे, अशी माहिती वाहतूक विभागाने दिली आहे.