'ठाकरेंचे 15 आणि काँग्रेसचे 10 आमदार संपर्कात' राहुल शेवाळे यांचा मोठा गौप्यस्फोट
शिवसेना नेते राहुल शेवाळे यांनी पत्रकार परिषदेत एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. त्यांनी दावा केला की, ठाकरे गटाचे १५ आणि काँग्रेसचे १० आमदार त्यांच्या संपर्कात आहेत. २३ जानेवारीला मोठा राजकीय भूकंप होणार आहे, असं राहुल शेवाळे यांनी सांगितलं. तसच, २३ जानेवारीला मुंबई महापालिकेवर भगवा फडकवण्याचा निर्धार केला जाईल आणि महायुतीचा महापौर होईल, अस देखील म्हणालेत.
काय म्हणाले राहुल शेवाळे?
२३ जानेवारी हा दिवस शिवसेनेतर्फे "शिव उत्त्सव" म्हणून साजरा केला जाणार आहे. या दिवशी शिवसेनेच्या निवडून आलेल्या सर्व खासदार आणि आमदारांचा भव्य नागरी सत्कार केला जाणार आहे. या विजयाचं समर्पण आम्ही बाळासाहेब ठाकरे यांच्या श्रद्धांजलीस म्हणून करीत आहोत. या विजयात आमच्या लाडक्या बहिणींचा मोठा सहभाग आहे, आणि त्या हस्ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनेच्या इतर मंत्र्यांचा सत्कार केला जाणार आहे.
२३ जानेवारीला मुंबई महापालिकेवर भगवा फडकवण्याचा निर्धार आणि महायुतीचा महापौर होण्याची घोषणा केली जाईल.
राज्यभरात शिवसेनेला मिळालेल्या यशानंतर, एकनाथ शिंदे यांच्या आभार यात्रेचे आयोजन करण्यात येणार आहे. रायगड आणि नाशिकमध्ये शिवसेनेच्या आमदारांमध्ये काही नाराजी आहे. ही नाराजी एकनाथ शिंदे यांच्या पर्यंत पोहोचवली आहे आणि पक्षांतर्गत या मुद्द्याचा निराकरण केला जाईल. तिन्ही पक्षांच्या नेतृत्वाने एकत्र येऊन या समस्येवर तोडगा काढेल.
खरा उदय तीन वर्षांपूर्वी एकनाथ शिंदे यांनी शपथ घेतल्यानंतर झाला होता. सूर्य एकच असतो, आणि कोणाचा उदय होईल हे मुद्दा नसून, दुसऱ्याचा अस्त होईल अशी काळजी सर्वांनी घ्यावी.
महाविकास आघाडीत अस्वस्थता निर्माण होत असून, त्यातील बिघाड वाढत आहे. प्रत्येक पक्ष आपलं आणि आपल्या कुटुंबाचं अस्तित्व टिकवण्यासाठी धावपळ करत आहे.
२३ जानेवारीला मोठा राजकीय भूकंप होणार आहे. शिवसेनेचे १५ आणि काँग्रेसचे १० आमदार आमच्या संपर्कात आहेत. तसेच, केंद्र सरकारमध्ये देखील राजकीय उलथापालथ होणार आहे. शिवसेनेचे ५ खासदार आमच्या संपर्कात आहेत. याची कुणकुण लागल्यामुळे संजय राऊत आणि वडेट्टीवार यांसारख्या नेत्यांनी वक्तव्यं केली आहेत.
दरम्यान, कॉंग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी शिंदेसेनेबाबत केलेल्या खळबळजनक दाव्यानंतर आता खासदार संजय राऊत यांनी देखील त्यांच्या या विधानाला दुजोरा दिला. शिंदेंच्या शिवसेनेची गरज संपली आहे. त्यामुळे त्यांना बाजूला सारतील आणि नवीन उदय पुढे येईल असा दावा, वडेट्टीवार यांनी केला आहे. याच विधानाला संजय राऊत यांनी दुजोरा देत आणखी मोठा दावाही केला आहे. उदय सामंत यांच्यासोबत २० आमदार असल्याचा खळबळजनक दावा राऊतांनी आज पत्रकारांशी बोलताना केला आहे.