Santosh Deshmukh Murder Case: बीडमध्ये 183 शस्त्र परवाने रद्द; आणखी 127 रद्द होणार
बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाने महाराष्ट्रामध्ये वातवरण तापलं आहे. या प्रकरणामुळे बीड जिल्ह्यामधील गुन्हेगारीचा मुद्दा प्रकाशात आला. तसेच सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी ट्विट करत बीडमधील शस्त्र परवान्यावर प्रश्न उपस्थित केले होते. याची गंभीर दखल प्रशासनाने घेतली असून परवाने रद्द करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. यामध्ये प्राथमिक स्वरूपात 100 परवाने रद्द केले होते. यामध्ये वाल्मीक कराड याच्या शस्त्राचा देखील समावेश होता.
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर पोलीस प्रशासन सतर्क झाले आहे. आत्तापर्यंत जिल्ह्यात 183 शस्त्र परवाने रद्द झाले आहेत. तर आठ जणांनी स्वतः सरेंडर होत आपली शस्त्रे जमा केली आहेत. बीड जिल्ह्यात नोंदणीकृत 1281 शस्त्र परवाने आहेत. त्यात 310 प्रस्ताव रद्द करण्यासाठी पाठवण्यात आले. यावर कार्यवाही करत आतापर्यंत 183 शस्त्र रद्द करण्यात आली असून 127 शस्त्र रद्द होणार आहेत.
विशेष बाब म्हणजे जिल्ह्यात ज्यांच्याकडे परवाना आहे. त्यांचे सर्वेक्षण सुरू असून पोलीस कर्मचारी घरी जाऊन परवानाधारक शस्त्र हाताळण्यास सक्षम आहे का? जिवंत आहे का? याची खात्री करतायत. यात अनेक जण मयत असल्याचे समोर आले आहे. त्यांचा आकडा 118 असल्याचे समजते, त्यामुळे आता हे सर्व परवाने रद्द केले जाणार आहे.