Jalna : लग्नसोहळ्यात आलेल्या 19 वर्षीय तरुणाचा करुण अंत; स्विमिंग पूलनं केला घात
लग्न म्हणजे आनंद, उत्साह आणि नात्यांचा सोहळा. पण एका कुटुंबासाठी हा सोहळा कायमचा शोकात बदलला. छत्रपती संभाजीनगरमधील जालना रोडवरील नामवंत हॉटेलमध्ये गुरुवारी रात्री घडलेल्या हृदयद्रावक घटनेत एका 19 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याने साऱ्यांच्याच भावना अनावर झाल्या आहेत. जाफराबाद (जि. जालना) येथील नागेश रामेश्वर शेळके हा महाविद्यालयीन तरुण आपल्या कुटुंबासोबत नातेवाईकाच्या लग्नासाठी शहरातील या प्रसिद्ध हॉटेलमध्ये आला होता. उत्साहात सहभागी झालेला नागेश संध्याकाळच्या सुमारास थोडा वेळ जलतरण तलावात पोहण्यासाठी गेला. मात्र, हा निर्णय त्याच्या आयुष्यातील शेवटचा ठरला.
रात्री 8 वाजण्याच्या सुमारास नागेश जलतरण तलावात उतरला. हॉटेल व्यवस्थापनाचा ढिसाळपणा यामुळे तलावाजवळ कोणतीही देखरेख नव्हती. काही वेळातच नागेश तलावात बेशुद्ध अवस्थेत आढळून आला. उपस्थितांनी तत्काळ त्याला जवळील खासगी रुग्णालयात हलवले, मात्र डॉक्टरांनी 9 वाजता त्याला मृत घोषित केले. या बातमीने कुटुंबीय, नातेवाईक आणि उपस्थित पाहुण्यांमध्ये शोककळा पसरली. साऱ्यांच्या डोळ्यांत अश्रू तर काळजांत भीती निर्माण झाली.
मृत्यूचं कारण अद्याप गुलदस्त्यात
सिडको पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेत घटनास्थळी भेट दिली असून, आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतरच स्पष्ट होणार असल्याचे पोलीस निरीक्षकांनी सांगितले. हृदयविकाराचा झटका, पाण्यात गुदमरणे, की इतर कोणतेही कारण?, हे सर्व तपासाअंती स्पष्ट होणार आहे.
हॉटेल प्रशासनाचा निष्काळजीपणा?
या दुर्दैवी घटनेमुळे हॉटेलच्या सुरक्षेच्या व्यवस्था आणि जबाबदारीवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहेत. जलतरण तलावासारख्या ठिकाणी योग्य देखरेख, लाइफगार्ड, सुरक्षा उपाययोजना नसल्यानेच ही दुर्दैवी घटना घडली का?, असे प्रश्न उपस्थित होत आहेत.