देवगड बांधकाम विभाग अंतर्गत कार्यरत 3 रस्ता कामगार वेतना विना, मागील दोन महिने झालेच नाही वेतन
प्रसाद पाताडे | सिंधुदुर्ग: सिंधुदुर्ग जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांचे अधिकारी कर्मचारी क्रीडा स्पर्धा आणि सांस्कृतिक महोत्सवाचा आनंद घेत असतानाच देवगड बांधकाम विभाग अंतर्गत कार्यरत असणाऱ्या ३ रस्ता कामगारांना मात्र दोन महिन्याच्या मानधनापासून वंचित राहावे लागले आहे. याकडे आज भारतीय मजदुर संघाचे कोकण विभागीय संघटन मंत्री हरी चव्हाण यांनी बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्या दालनाबाहेर ठिय्या आंदोलन करत अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले. तसेच या कामगारांचे मानधन होत नाही तोपर्यंत उठणार नसल्याचा इशारा दिला.
देवगड बांधकाम विभागाच्या अखत्यारीत असलेल्या ३ रस्ता कामगारांचे डिसेंबर २०२२ व जानेवारी २०२३ या दोन महिन्यांचे वेतन अद्याप झालेले नाही. याबाबत वारंवार प्रशासनाचे लक्ष वेधून ही मानधन होत नसल्याने आज भारतीय मजदुर संघाचे कोकण विभागीय संघटन मंत्री हरी चव्हाण यांनी बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्या दालनाबाहेर ठिय्या आंदोलन केले. यावेळी ते म्हणाले की, रस्ता कामगारांचे वेतन होत नाही याबाबत आपण माहिती घेतली असता प्रथम या विभागाकडे वेतनासाठी निधी नसल्याचे सांगण्यात येत होते. त्यासंदर्भात पाठपुरावा केल्यानंतर निधी मिळाला मात्र या कामगारांचे मानधन देण्यासाठी लागणाऱ्या धनादेशाचे गटविकास अधिकारी यांच्या सह्या झाल्या नसल्याने मानधन मिळाले नाही. आपण सह्या का झाल्या नाहीत याबाबत खात्री केली असता जिल्हा परिषद क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक महोत्सवामध्ये सर्व अधिकारी कर्मचारी व्यस्त असल्याने बिले पडली नसल्याचे कारण पुढे आले. मात्र या स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रमात या रस्ता कामगारांना त्यांच्या हक्काच्या मानधनापासून वंचित राहावे लागले असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.
देवगड उप अभियंता निष्क्रिय
देवगड बांधकाम विभागच उपअभियंता नरेंद्र महाले यांना कामगारांचे काही पडले नाही. कामगारांचे मानधन व्हावे अशी त्यांची मानसिकता नाही. असे सांगत उपअभियंता महाले हे बांधकाम विभागातील निष्क्रिय असल्याचा आरोप हरी चव्हाण यांनी केला आहे. तसेच महाले यांच्या दुर्लक्षमुळेच कामगारांना मानधन पासून वंचित राहावे लागले असल्याचे हरी चव्हाण यांनी सांगितले.