उरी सेक्टरमध्ये 3 दहशतवाद्यांना कंठस्नान
जम्मू-काश्मीरमधील उरी सेक्टरमध्ये तीन दहशतवाद्यांना भारतीय सैन्यांनी कंठस्नान घातल्याची माहिती मिळत आहे. आज पहाटेपासून लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये या परिसरात जोरदार चकमक सुरू असल्याची माहिती मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून जम्मू काश्मिरमध्ये घुसखोरीचे प्रमाण वाढले असून दहशतवाद्यांच्या कारवायाही वाढल्या असल्याने भारतीय सैन्यांकडून कडक कारवाई करण्यात येत आहे.
गेल्या काही दिवसांपासून उरी सेक्टरमध्ये दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न होत असून त्यांच्या कारवाया मोडून काढण्यात येत आहे. भारतीय सैन्यांनी परिसरात घुसरीचा प्रयत्न करण्यात येत असल्याने दहशतवाद्यांविरोधात जोरदार कारवाईला सुरुवात केली आहे. काही तासांपूर्वी भारतीय सैन्यांना उरी सेक्टरमध्ये दहशतवादी घुसल्याची खबर मिळाली होती, त्यामुळे या ठिकाणी शोध मोहीम राबवतानाच दहशतवाद्यांनी सैन्यांवर अंधाधूंद गोळीबार चालू केला, त्यामुळे भारतीय जवानांनही जोरदार प्रत्युत्तर देत तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले.
नौशेरा सेक्टरमध्ये झालेल्या स्फोटात दोन दहशतवादी ठार झाले, तर लष्कराने एक दहशतवादी जिवंत पकडला आहे. नौशेरामधील झांगार सेक्टरमध्ये तैनात लष्कराच्या जवानांनी 21 ऑगस्ट रोजी सकाळी नियंत्रण रेषेवर दोन ते तीन दहशतवाद्यांना घुसखोरी करताना पाहिलं. एका दहशतवाद्याने भारतीय चौकीजवळ येऊन कुंपण कापण्याचा प्रयत्न केला. यावेळी सैनिकांनी दहशतवाद्यावर गोळीबार केला. तेव्हा त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याच्या पायाला गोळी लागल्याने तो जखमी झाला आणि पकडला गेला.