भारतीय विद्यार्थ्यांची चिंता वाढली; अमेरिकेतील 30 विद्यापीठांनी 10 हजार विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारला

भारतीय विद्यार्थ्यांची चिंता वाढली; अमेरिकेतील 30 विद्यापीठांनी 10 हजार विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारला

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणात्मक आदेशांमुळे 10 हजार भारतीय विद्यार्थ्यांना अमेरिकेतील 30 विद्यापीठांनी प्रवेश नाकारला.
Published by :
Team Lokshahi
Published on

एकेकाळी 'अमेरिकन ड्रीम' म्हणून ओळखले जाणारे शिक्षणाचे स्वप्न आता भारतीय विद्यार्थ्यांसाठी दुःस्वप्न ठरत आहे. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणात्मक आदेशांमुळे यंदा सुमारे 10 हजार भारतीय विद्यार्थ्यांना अमेरिकेतील येल, ब्राऊन, कॉर्नेल, स्टॅनफर्ड, बोस्टन आणि वॉशिंग्टनसारख्या आघाडीच्या 30 विद्यापीठांनी प्रवेश नाकारला आहे. अशी माहिती न्यूयॉर्कचे भास्कर समुहाचे मोहम्मद अली यांनी दिली आहे.

या विद्यार्थ्यांनी विज्ञान, वाणिज्य आणि कला शाखांमध्ये अर्ज केले होते. त्यांची प्रवेश प्रक्रिया जवळपास अंतिम टप्प्यात आली होती. मात्र मार्चअखेरीस प्रवेश ऑफर लेटर अचानक रद्द करण्यात आले. बोस्टन विद्यापीठातील हवामान बदल विषयात पीएचडीसाठी अर्ज करणाऱ्या मनीष (नाव बदलले) यांनी सांगितले की, "हवामान बदल हा ट्रम्प सरकारसाठी प्राधान्याचा विषय नाही, त्यामुळे मला नकार मिळाला."

शासनाच्या निधीअभावी पीएचडी नोंदणीत घट

पेन विद्यापीठाच्या एका प्राध्यापकाने स्पष्ट केले की, "सरकारकडून शैक्षणिक निधी बंद झाल्यामुळे पीएचडी नोंदणीत घट झाली आहे." त्यामुळे अनेक प्रकल्प आणि अभ्यासक्रम थांबवावे लागले आहेत.

ट्रम्प आदेशाला हार्वर्ड आणि कोलंबियाचा विरोध

दरम्यान, ट्रम्प यांच्या आदेशांना हार्वर्ड विद्यापीठाने थेट विरोध दर्शवत स्पष्ट केले की, "आम्ही मनमानी आदेश खपवून घेणार नाही." आर्थिकदृष्ट्या जगातील सर्वात श्रीमंत मानले जाणारे हार्वर्ड विद्यापीठाची संपत्ती सुमारे 4.5 लाख कोटी रुपये आहे, जी जगातील 100 हून अधिक देशांच्या GDP पेक्षा जास्त आहे.

हार्वर्डनंतर कोलंबिया विद्यापीठानेही ट्रम्प आदेशांना नकार दिला. ट्रम्प यांनी 60 विद्यापीठांना यहुदीविरोधी निदर्शने थांबवण्याचे आणि बाह्य एजन्सीकडून ऑडिटचे आदेश दिले होते. परंतु, देशांतर्गत दबाव आणि आंतरराष्ट्रीय शिक्षणात निर्माण होणाऱ्या प्रश्नांमुळे अनेक विद्यापीठे आता या आदेशांना प्रतिकार करत आहेत.

एफ-1व्हिसावरही परिणाम, 4.5लाखपैकी फक्त ३ लाखांना मंजुरी

या वर्षी 4.5 लाख भारतीय विद्यार्थ्यांनी एफ-1 व्हिसासाठी अर्ज केला होता, मात्र केवळ 3 लाख विद्यार्थ्यांनाच व्हिसा मंजूर झाला. गेल्या वर्षी हे प्रमाण साडेतीन लाखांपेक्षा अधिक होते. अमेरिकेत दरवर्षी 12 लाखांहून अधिक परदेशी विद्यार्थी शिक्षणासाठी दाखल होतात, आणि भारतीय विद्यार्थी गेल्या दोन वर्षांपासून यामध्ये आघाडीवर आहेत.

भारतीय विद्यार्थ्यांसाठी धोक्याचा इशारा

ही स्थिती पाहता अमेरिकेत उच्च शिक्षण घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी ही धोक्याची घंटा आहे. राजकीय धोरणे, निधीअभावी निर्णय आणि वाढती अस्थिरता यामुळे अनेकांचे शिक्षण, करिअर आणि भविष्य अंधारात जात आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com