Zohran Mamdani : ट्रम्प यांना मोठा धक्का; न्यूयॉर्कमध्ये भारतीय वंशाचा महापौर

Zohran Mamdani : ट्रम्प यांना मोठा धक्का; न्यूयॉर्कमध्ये भारतीय वंशाचा महापौर

न्यूयॉर्ककरांनी निवडणुकीत असा निर्णय दिला की जगभरातील महानगरांच्या सत्ताकेंद्रांमध्ये नवा राजकीय प्रवाह उभा राहिला आहे. झोहरन ममदानी वय फक्त 34 वर्षे आणि आता न्यूयॉर्कचे पहिले मुस्लिम, पहिले भारतीय वंशाचे, पहिले दक्षिण आशियाई आणि सर्वात तरुण महापौर.
Published by :
Riddhi Vanne
Published on

थोडक्यात

  • अमेरिकेच्या सर्वात मोठ्या आणि प्रभावशाली शहरात काल इतिहास पुन्हा लिहिला गेला.

  • जगभरातील महानगरांच्या सत्ताकेंद्रांमध्ये नवा राजकीय प्रवाह उभा राहिला आहे.

  • झोहरन ममदानी वय फक्त 34 वर्षाचे न्यूयॉर्कचे महापौर

New York's first Indian Origin Mayor : अमेरिकेच्या सर्वात मोठ्या आणि प्रभावशाली शहरात काल इतिहास पुन्हा लिहिला गेला. न्यूयॉर्ककरांनी निवडणुकीत असा निर्णय दिला की जगभरातील महानगरांच्या सत्ताकेंद्रांमध्ये नवा राजकीय प्रवाह उभा राहिला आहे. झोहरन ममदानी वय फक्त 34 वर्षे आणि आता न्यूयॉर्कचे पहिले मुस्लिम, पहिले भारतीय वंशाचे, पहिले दक्षिण आशियाई आणि सर्वात तरुण महापौर.

हे केवळ निवडणूकविजयाचे आकडे नाहीत; ही विचारांच्या, प्रतिनिधित्वाच्या आणि सामाजिक न्यायाच्या नव्या पायाभरणीची सुरुवात आहे. दोन मिलियनहून अधिक मतदारांनी हा बदल स्वीकारला आणि पारंपरिक राजकारणाला नव्या जनमताचा धडा दिला.\

भांडवलशाहीच्या मध्यभागी समाजवादी विचारांचा उदय

आर्थिक साम्राज्याचे प्रतीक, कॉर्पोरेट आणि भांडवलशाहीचे जागतिक केंद्र. अशा शहराचे नेतृत्व आता स्वतःला डेमोक्रॅटिक सोशलिस्ट म्हणणाऱ्या तरुण नेत्याकडे दिले गेले आहे. हा केवळ राजकीय परिणाम नाही; हे सामाजिक-आर्थिक असंतोषाचे, वाढत्या विषमतेचे आणि परवडणाऱ्या जीवनासाठीच्या संघर्षाचे उत्तर आहे.

ममदानींच्या घोषणांमध्ये “न्यूयॉर्क पुन्हा परवडेल असे बनवू” हा संदेश मध्यवर्ती होता. वाढती भाडेवाढ, महागाई, बेघरांची संख्या, महागडी वाहतूक सामान्य माणसाचा श्वास गुदमरू लागला होता. आणि त्या अस्वस्थतेला दिशा देणारे नेतृत्व ममदानींच्या रूपाने समोर आले.

त्यांची वचने साधी पण व्यापक

  • स्थिरीकृत भाड्यावर नियंत्रण

  • मोफत बस सेवा

  • सर्वांसाठी मोफत बालसंगोपन

  • शहर मालकीची किराणा दुकाने

सरकार जनकल्याणाचे साधन बनू शकते, नागरिकांचे जीवन हलके करू शकते हा विश्वास त्यांनी पुन्हा दृढ केला.

सात वर्षांचा मुलगा ते न्यूयॉर्कचा पहिला नागरिक

कंपाला, युगांडा येथे जन्म. आई चित्रपट दिग्दर्शिका मीरा नायर. वडील संशोधक महमूद ममदानी. लहानपणी न्यूयॉर्कला स्थलांतर. फक्त 2018 मध्ये अमेरिकन नागरिकत्व प्राप्त आणि फक्त सहा वर्षांत अमेरिकेतील सर्वात प्रतिष्ठेचा महानगरप्रमुख. त्यांचा प्रवास ग्लॅमरचा नव्हे, तर संघर्षाचा आणि संवेदनशीलतेचा आहे. बेदखलीच्या संकटात सापडलेल्या गरीब घरमालकांना वाचवताना त्यांनी आर्थिक विवंचनेचे चटके अनुभवले. म्हणूनच त्यांची राजकारणातील भाषा फक्त वचनांची नाही, ती वास्तवातून जन्मलेली आणि कार्याच्या अनुभवातून शार्प झालेली आहे.

ही निवडणूक एका पिढीचा जाहीरनामा

हा निकाल अमेरिकन राजकारणातील पिढीगत बदलाचे प्रतीक आहे. पारंपरिक सत्ता-गोत्र, आर्थिक हितसंबंध आणि राजकीय वारसा यांना आव्हान देत नागरिकांनी तरुण, स्थानिक मुद्दे समजणाऱ्या, लोकांमध्ये मिसळणाऱ्या नेतृत्वाला पसंती दिली. झोहरन ममदानींचे विजयी ट्वीट “The next and last stop is City Hall” आत्मविश्वास सांगतं, पण त्याहून महत्त्वाचं म्हणजे नव्या न्यूयॉर्कचा दृष्टीकोन दाखवतं.

एक प्रतीक, एक संदेश

हा विजय फक्त एका व्यक्तीचा नाही;

तो प्रतिनिधित्वाच्या विस्तारित विश्वाचा आहे. तो अमेरिकेतील शहरी राजकारणाला नवी दिशा देणारा आहे. तो भारतीय वंशाच्या आणि मुस्लिम समुदायाच्या जगभरातील तरुणांमध्ये नव्या शक्यतांचा ध्वज रोवणारा आहे.

न्यूयॉर्कने आज एक गोष्ट पुन्हा सिद्ध केली

विचार बदलले की शहर बदलते. आणि शहर बदलले की जगही बदलते.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com