मध्यरात्री गोठ्याला आग ;चार जनावरांचा होरपळून मृत्यू
भूपेश बारंगे | वर्धा : जिल्ह्याच्या समुद्रपूर तालुक्याच्या रेणकापूर येथे मध्यरात्री गोठ्याला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. या आगीत चार जनावरांचा होरपळून मृत्यू झाला असून एक बैल जखमी झाला. तर आग विझवताना शेतकरी व त्याच्या मुलाला दुखापत झाली आहे. या घटनेमुळे शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
वर्ध्यातील रेणकापूर येथील शेतकरी आत्माराम निखाडे यांचा त्यांच्या घराजवळ गोठा आहे. गोठ्याला गुरुवारी मध्यरात्री तीन वाजताच्या दरम्यान शॉर्टसर्किटने आग लागल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. यामुळे गोठ्याला बांधून असलेल्या पाच जनावरांपैकी चार जनावरांचा जळून मृत्यू झाला. तर, एक बैल गंभीर जखमी झाला. शिवाय या आगीत गोठ्यामध्ये ठेवलेले शेती साहित्यही जळून खाक झाले. गोठ्याला घर लागून असल्याने घरातील फ्रिज, पंखा आणी घरातील पलंगाचे सुद्धा नुकसान झाले असून जवळपास दहा लाखांचे नुकसान झाले आहे.
घरातील कुटुंबाची तारांबळ:
रात्री निखाडे कुटुंब झोपी गेले अन मध्यरात्री अचानक लागलेल्या आगीमुळे घरच्यां कुटुंबाची तारांबळ उडाली. ही आग विजविण्यासाठी शेतकरी आत्माराम निखाडे आणी त्याचा मुलगा अशीच निखाडे हे प्रयत्न करत असतांना आगीच्या या रौद्र रूपात दोघांना गंभीर दुखापत झाली. घटनेची माहिती मिळताच गावातील नागरिकांनीही घटनास्थळी धाव घेतली. आग विझविण्यासाठी समुद्रपूर नगरपालिकेचे पाण्याचे टँकर आणी हिंगणघाट पालिकेच्या अग्निशमक दलाला बोलवून आग आटोक्यात आणली. या घटनेत शेतकऱ्याचे मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून तातडीने पीडित शेतकऱ्याला मदतीची मागणी केली जात आहे.
राज्यात लंपीचा कहर:
राज्यभरात लंपी या आजाराचं सावट आहे. हा आजार विशेषत: गायींमध्ये दिसून येत असल्यानं गौपालन करणाऱ्या शेतकऱ्यांची चिंता आधीच वाढली आहे. त्यात अश्या आगीच्या घटनेमुळं आत्माराम निखाडे व त्यांचे कुटूंबीय पुर्णत: खचले आहेत.