शहाजीबापूंसह इतर आमदारांच्या विरोधात उतरले सांगोला तालुक्यातील ४५ सरपंच

शहाजीबापूंसह इतर आमदारांच्या विरोधात उतरले सांगोला तालुक्यातील ४५ सरपंच

अनुसूचित जाती आणि नवबौद्ध घटकांच्या वस्त्यांच्या विकास निधींचे वाटप करताना आमदारांनी शिफारस केलेल्या गावांनाच निधी मिळतो.
Published by :
Siddhi Naringrekar

वसिम अत्तर , सोलापूर

अनुसूचित जाती आणि नवबौद्ध घटकांच्या वस्त्यांच्या विकास निधींचे वाटप करताना आमदारांनी शिफारस केलेल्या गावांनाच निधी मिळतो.निधी वाटपात आमदार शहाजीबापूंसह इतर आमदारांचा हस्तक्षेप होत असल्याचा आरोप सांगोला तालुक्यातील ४५ सरपंचांनी केला आहे. शेतकरी कामगार पक्षाचे सांगोल्यातील ४५ सरपंच हे जिल्हा परिषदेत आले होते. त्यांनी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहीनकर यांची भेट घेत आपली विकास कामासाठी निधी मिळत नसल्याचा आरोप केला.संदीप कोहिनकर यांनी सरपंचांचे म्हणणे ऐकून घेतले.त्यांच्या मागणीसंबंधी समाजकल्याण अधिकारी सुनील खामितकर यांच्याशी चर्चा करून निर्णय घेऊ असे सांगितले.

विकास कामांसाठी स्थळ निश्चित करण्याचे अधिकार विषय समिती,स्थायी समिती आणि जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेस आहेत.सध्या प्रशासक नियुक्त असल्याने त्यांच्याकडून न्यायाची अपेक्षा करणे काही गैर नाही.ग्रामपंचायतीने अनुसुचित जाती वस्तीमधील विकास कामासंदर्भात केलेला ठराव ग्राह्य का धरला जात नाही, असाही प्रश्न यावेळी उपस्थित करण्यात आला. सरपंचांची यादी ग्राह्य धरावी अशी आग्रही मागणी यावेळी करण्यात आली. याची दखल घेतली नाही तर 'काय झाडी, काय डोंगर' फेम आमदार शहाजी पाटलांविरोधात रस्त्यावर उतरण्याची भूमिका या 45 सरपंचांनी घेतली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com