POCSO Act Case : चॉकलेटचे आमिष दाखवून चिमुकलीवर अत्याचार; आरोपीला अटक
छत्रपती संभाजीनगर येथील संजयनगर भागात पाच वर्षांच्या चिमुकलीवर चॉकलेटचे आमिष दाखवून अत्याचार झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी जिन्सी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून, पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपी शफिक खान हनीफ खान (वय 38) याला अटक केली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, खासगी शाळेत शिक्षिका असलेली महिला आपल्या कुटुंबासह पंधरवड्यापूर्वी संजयनगर भागातील एका चार मजली इमारतीत भाडेकरू म्हणून राहण्यास आली होती. या इमारतीच्या तळमजल्यावर घरमालक राहत असून, आरोपी शफिक खान याचे वास्तव्य देखील तिथेच आहे. पीडित चिमुकलीचा परिवार पहिल्या मजल्यावर राहतो.
घटनेच्या दिवशी पीडित मुलगी अंगणात खेळत होती. त्याच दरम्यान, आरोपीने चॉकलेटचे आमिष दाखवून तिला घरात बोलावून घेतले आणि तिच्यावर अमानुष अत्याचार केला. या घटनेनंतर घाबरलेल्या मुलीने रडत रडत आपल्या आईला सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर कुटुंबियांनी तिला तात्काळ रुग्णालयात दाखल केले.
या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, पीडितेच्या नातेवाइकांनी तातडीने जिन्सी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी POCSO कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केली असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक माने यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. न्याय मिळेपर्यंत लढा थांबणार नाही, असा निर्धार पीडित कुटुंबाने व्यक्त केला आहे. दरम्यान, आरोपीवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांतून होत आहे.