500 Rupees Note: 500 रुपयांच्या नोटेवर महात्मा गांधींच्या जागी प्रभू श्रीरामाचा फोटो? जाणून घ्या काय आहे सत्य

500 Rupees Note: 500 रुपयांच्या नोटेवर महात्मा गांधींच्या जागी प्रभू श्रीरामाचा फोटो? जाणून घ्या काय आहे सत्य

सध्या सोशल मीडियावर प्रभू श्रीरामाचा फोटो असलेली 500 रुपयांची नोट खूप चर्चेत आहे.
Published by :
Team Lokshahi

येत्या 22 जानेवारी रोजी अयोध्येत प्रभू श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. या ऐतिहासिक सोहळ्यामुळे अवघा देश राममय झाला आहे. मात्र या सोहळ्यापूर्वी अयोध्या आणि राम मंदिरासंदर्भात विविध प्रकारच्या पोस्ट इंटरनेटवर व्हायरल होत असून, सध्या सोशल मीडियावर प्रभू श्रीरामाचा फोटो असलेली 500 रुपयांची नोट खूप चर्चेत आहे. आरबीआय 500 रुपयांची नवीन नोट जारी केल्याची सोशल मीडीयावर चर्चा आहे. भारतीय रिझर्व्ह बँकने 500 रुपयांची नवी नोट जारी केल्याचा दावा केला जात आहे. यामागचं सत्य काय आहे, हे जाणून घ्या.

पाचशे रुपयांच्या नोटेची छायाचित्रं देखील सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. या पाचशे रुपयांच्या नव्या नोटेवर श्रीराम आणि धनुष्यबाणाचं चित्र असलेला व्हिडिओ व्हायरल होतो. त्यामध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जागी श्रीरामाचा तर नोटेच्या मागील बाजुला लाल किल्ल्याच्या जागी अयोध्येतील राम मंदिराचा फोटो असणारी 500 ची नोट व्हायरल होत आहे. 22 जानेवारीला अयोध्येत होणाऱ्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर नवी नोट जारी होणार असल्याची चर्चा देखील सोशल मीडियावर होत आहे. आरबीआयच्या वेबसाईटवर बँकेच्या नोटांमध्ये करण्यात येणार्‍या बदलांबाबत अशी कोणतीही माहिती आढळलेली नाही. आरबीआयने याची कोणतीही पुष्टी केलेली नाही. आरबीआयच्या वेबसाइटवर उपलब्ध माहितीनुसार, सध्याच्या 2000 रुपयांची नवीन मालिका 500, 200, 100, 50, 20 आणि 10 रुपयांच्या नोटांवर महात्मा गांधींचं चित्र असणार आहे. त्यामुळे नागरिकांनी अशा बनावट नोटांना बळी पडू नये.

दरम्यान, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून प्रभू श्री रामाचे चित्र असलेल्या 500 रुपयांच्या नव्या नोटांच्या मालिकेबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. भगवान श्रीरामाच्या फोटोसह व्हायरल होत असलेली 500 रुपयांची नोट बनावट असल्याची माहिती बँकिंग क्षेत्रातील अधिकाऱ्यांनी दिली आहे. या नोटांबाबत आरबीआयने कोणतीही माहिती दिली नाही. ही खोटी बातमी असल्याचं समोर आलं आहे. आरबीआय 500 रुपयांच्या नव्या सीरिजच्या नोटा जारी करणार नसल्याचं समोर आले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com