भारतात ऑक्टोबरपासून 5G सेवा सुरु होणार : केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव
देशभरात 12 ऑक्टोबरपर्यंत 5G सेवा सुरु करण्यात येणार असून 5G सेवा सुरु झाल्यानंतर त्याचा देशभरात टप्या टप्यानं विस्तार करण्यात येणार आहे. नुकताच 5 जी स्पेक्ट्रमचा लिलाव पार पडला, यामधून सरकारनं दीड लाख कोटींचा महसूल गोळा केला आहे. लिलावानंतर 5G सेवा कधी सुरु होणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं होते. आता ही सेवा 12 ऑक्टोबरपर्यंत सुरु होणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे.
दूरसंचार विभागाच्या (DoT) माहितीनुसार, देशभरात 13 शहरात सर्वात आधी 5G सेवा उपलब्ध होणार आहे. या 13 शहरांमध्ये अहमदाबाद, बेंगळुरु, चंडीगढ, चेन्नई, दिल्ली, गांधीनगर, गुरुग्राम, हैदराबाद, जामनगर, कोलकाता, लखनऊ, मुंबई आणि पुणे या शहरांचा समावेश आहे.
अश्विनी वैष्णव म्हणाले की, 5G सेवा सुरु करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. दूरसंचार ऑपरेटर त्या दृष्टीने काम करत आहेत. इन्स्टॉलेशनचं काम पूर्ण झालं आहे. 12 ऑक्टोबरपर्यंत 5G सेवा सुरु होईल, असा अंदाज आहे. त्यानंतर टप्या टप्यानं शहरी आणि ग्रामीण भागामध्ये 5G सेवाचा विस्तार करण्यात येईल. 5G सेवा सर्वसामान्यांनाही परवडणाऱ्या किमतीमध्ये असेल. तसेच पुढील दोन ते तीन वर्षांमद्ये देशभरात 5G सेवा पोहचण्याचं आमचं ध्येय आहे. 5G सेवा सर्वसामान्यांना परवडणारी असेल, याचीही आम्ही खात्री करू. त्यासाठी शहरी आणि ग्रामीण या दोन्ही भागांकडे आम्ही लक्ष देत आहोत.