Shravan 2025 : श्रावणात भाविकांसाठी एसटीची विशेष सुविधा; भीमाशंकरसाठी सोडणार 80 बसेस
श्रावण महिन्याच्या पार्श्वभूमीवर भीमाशंकर येथे जाणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) पुणे विभागाकडून विशेष बससेवेचे नियोजन करण्यात आले आहे. यंदा एकूण 80 एसटी बसगाड्या भीमाशंकरच्या मार्गावर धावणार आहेत.
भीमाशंकर ते पार्कींगदरम्यान भाविकांच्या सोयीसाठी 50 विशेष गाड्या उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. याशिवाय, शिवाजीनगर, खेड आणि मंचर आगारातून रोजच्या नियमित फेऱ्यांमध्ये 30 बसगाड्या धावणार आहेत.
दरवर्षी श्रावणात मोठ्या प्रमाणावर भक्तगण भीमाशंकर येथे दर्शनासाठी येत असतात. त्यामुळे भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून एसटीकडून अतिरिक्त बससेवा उपलब्ध करून दिली जाते. यावर्षीही हेच धोरण कायम ठेवण्यात आले आहे.
गणेशोत्सवासाठी कोकणातही विशेष सेवा
गौरी-गणपतीच्या सणानिमित्त कोकणात प्रवास करणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी असते. मागील वर्षी 80 ग्रुप बुकिंग आणि 146 आरक्षित बससेवा पुरवण्यात आली होती. यंदाही अशाच प्रकारे नियोजन करण्यात आले असून, आवश्यकतेनुसार अतिरिक्त गाड्याही सोडल्या जातील, अशी माहिती एसटी प्रशासनाने दिली.
विभाग नियंत्रक अरुण सिया यांनी सांगितले की, "श्रावण महिन्यानिमित्त भीमाशंकरसाठी 50 विशेष बसगाड्या सोडण्यात आल्या आहेत. शिवाजीनगर, खेड व मंचर येथून नियमित सेवा सुरू आहे. भाविकांची संख्या वाढल्यास अधिक गाड्यांचे नियोजन तत्काळ करण्यात येईल."
एसटीच्या या नियोजनामुळे श्रावण महिन्यात भीमाशंकरला जाणाऱ्या भाविकांना मोठा दिलासा मिळणार आहे. गर्दीच्या काळातही वेळेवर आणि सुरक्षित सेवा मिळावी, यासाठी प्रशासन सज्ज असून भाविकांनीही सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.