बोगस डिग्री प्रकरणी मुंबई, पुण्यासह देशभरात 91 ठिकाणी सीबीआयची छापेमारी
नवी दिल्ली : देशभरात आज सीबीआयने छापेमारी केली आहे. फॉरेन मेडिकल ग्रॅज्युएट्सशी संबंधित बोगस डिग्री प्रकरणी ही छापेमारी करण्यात आली आहे. यात महाराष्ट्रातील मुंबई, नागपूर, पुणे, बुलढाणा, जळगावचाही समावेश आहे. यामुळे वैद्यकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.
सीबीआयने 21 तारखेला 73 जणांविरोधात गुन्हा दाखल केला होता. यानुसार 14 राज्य वैद्यकीय परिषद आणि 73 परदेशी वैद्यकीय पदवीधारकांविरुद्ध सीबीआयने तपास सुरू केला आहे. या परदेशी विद्यार्थ्यांना फॉरेन मेडिकल ग्रॅज्युएट परीक्षा (FMGE)उत्तीर्ण न करताच रूग्णांवर उपचार करण्याची परवानगी दिली होती. नियमांनुसार, परदेशी वैद्यकीय पदवीधरांना राष्ट्रीय परीक्षा मंडळाने घेतलेली एफएमजीई/स्क्रीनिंग चाचणी उत्तीर्ण करणे अनिवार्य आहे. त्यानंतरच त्यांना राष्ट्रीय वैद्यकीय आयोग किंवा राज्य वैद्यकीय परिषदेकडून तात्पुरती किंवा कायमस्वरूपी नोंदणी मिळते, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
परंतु, रशिया, युक्रेन, चीन आणि नायजेरियातील 73 परदेशी वैद्यकीय विद्यार्थी 2011-22 दरम्यान स्क्रीनिंग परीक्षेला बसले नाहीत. तरीही त्यांनी विविध राज्यांतील वैद्यकीय परिषदेकडून नोंदणी करून घेतली आहे. अशा अपात्र डॉक्टरांच्या बनावट नोंदणीमुळे देशातील नागरिकांच्या आरोग्याला हानी पोहोचू शकते, अशी माहिती राष्ट्रीय परीक्षा मंडळाने आरोग्य मंत्रालयाला दिली होती. यानंतर सीबीआयने स्टेट मेडिकल कौन्सिल, मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया आणि 73 परदेशी वैद्यकीय पदवीधारकांविरुद्ध भ्रष्टाचार, गुन्हेगारी कट आणि फसवणुकीच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला आहे.