Raj Thackeray : मतदार यादीत 96 लाख बोगस नावे; राज ठाकरेंनी उघड केली मोठी बाब
थोडक्यात
गोरेगाव नेस्को ग्राऊंडवर मनसेचा ग्रॅंड मेळावा
मेळाव्यात राज्यातील सर्व पदाधिकारी पोहोचले
राज ठाकरे निवडणूक आयोगावर संतापले
महाराष्ट्रातील मतदार यादीत निवडणूक आयोगाने नव्याने 96 लाख बोगस मतदार घुसवले आहेत, असा खळबळजनक आरोप मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी केला. मला असं कळालं की, 1 जुलैला निवडणूक आयोगाने (Election Commission) मतदारांची यादी बंद केली. त्यानंतर महाराष्ट्रात मतदारांच्या यादीत 96 लाख खोटे मतदार भरले आहेत, अशी माहिती मला खात्रीलायक सूत्रांनी दिल्याचे राज ठाकरे यांनी म्हटले. मुंबई, पुणे, नाशिक, ठाणे अशा सर्व शहरांमध्ये तब्बल आठ ते साडेआठ लाख मतदार घुसवण्यात (Voters) आले आहेत. प्रत्येक शहरात आणि गावातील याद्यांमध्ये हे खोटे मतदार घुसवण्यात आले आहेत, असे राज ठाकरे यांनी म्हटले. ते रविवारी मुंबईतील नेस्को मैदानावर झालेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात बोलत होते.
राज ठाकरेंच्या सभांना फक्त गर्दी होते, त्यांना मतं मिळत नाहीत, असे सत्ताधारी म्हणत असतात. त्यांचा एकही आमदार आणि खासदार नाही, असेही म्हटले जाते. पण अशाप्रकारे बोगस मतदार घुसवून निवडणुका घेतल्या जात असतील तर आमचे आमदार-खासदार कसे निवडून येणार, असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला. सत्ताधाऱ्यांकडून मतदार यादीतच गणित सेट केले जात आहे. मग तुम्ही मतदान करा नाहीतर नका करु. मग सामान्य जनतेच्या मतदानाला काय अर्थ उरतो? आम्ही निवडणूक आयोगावर बोललो की, सत्ताधारी चिडतात. तुम्हाला कोणी विचारलंय? आम्ही केलेले आरोप मनाला लागतात म्हणूनच सत्ताधारी बोलत आहेत ना? तुम्हाला राग येतोय कारण तुम्ही शेण खाल्लंय. गल्लीगल्लीत माहिती आहे, कशी सत्ता आली, कसे राजकारण सुरु आहे, असे राज ठाकरे यांनी म्हटले.
यंदा विधानसभा निवडणुकीत महायुतीचे 232 आमदार निवडून आले. इतकं प्रचंड यश मिळूनही महाराष्ट्रात प्रचंड सन्नाटा होता. कुठेही विजयी मिरवणुका काढण्यात आल्या नाहीत, जल्लोष झाला नाही. मतदारही हा निकाल पाहून अवाक झाले. निवडून आलेल्यांना कळलं नाही, आपण कसे निवडून आलो. मतदार याद्यात बोगस मतदार घुसवून सत्ताधारी स्थानिक पक्षांना संपवत आहेत, असा आरोप राज ठाकरे यांनी केला. जोपर्यंत महाराष्ट्रातील मतदार याद्या साफ होत नाही, तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊनच दाखवा, असे आव्हानही राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगाला दिले.