Coronavirus Update : धक्कादायक! वसईत कोरोनाचा पहिला बळी; 43 वर्षीय व्यक्तीनं उपचारादरम्यान गमावला जीव
वसईच्या ग्रामीण भागात कोरोनाचा पहिला बळी गेला आहे. विनीत विजय किणी ( वय 43) असे मृत कोरोनाग्रस्ताचे नाव आहे. ते वसई खोचिवडेमधील भंडारआळी येथील राहणारे होते. श्वसनाच्या त्रासामुळे त्यांना काल रात्री 6.58 मुंबईतील रहेजा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांची कोरोना चाचणी सकारात्मक आली होती. आज सकाळी 7.12 वाजता त्यांचा मृत्यू झाला.
कोरोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होताना पाहायला मिळत आहे. कोरोना व्हायरसच्या नव्या स्ट्रेनमुळे धोका वाढला असल्याचे पाहायला मिळत आहे. यातच आता भारतात सक्रिय कोविड रुग्णांची संख्या 2710 वर पोहोचली आहे. केरळमध्ये सर्वाधिक 1147 रुग्ण आढळले आहेत. यासोबतच महाराष्ट्रात 424 रुग्ण आढळले असून कर्नाटक, तामिळनाडूत प्रत्येकी 148 रूग्ण सापडले असल्याची माहिती मिळत आहे. भारतातील अनेक राज्यांमध्ये कोविडच्या प्रकरणांमध्ये वाढ होताना दिसत आहे.