Jitendra Awhad vs Eknath Shinde : ठाण्यात राष्ट्रवादीला मोठा धक्का; महिलांसह अनेक स्थानिक पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची चाहूल लागली असून सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. अशात ठाण्यातील कळवा-मुंब्रा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) ला मोठा धक्का बसला आहे. या मतदारसंघातील असंख्य कार्यकर्ते व पदाधिकारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत.
कळवा येथील ज्येष्ठ नगरसेवक मिलिंद पाटील यांच्या माध्यमातून हा भव्य पक्षप्रवेश सोहळा ठाण्यातील टेंभी नाका येथील आनंदआश्रम येथे पार पडणार आहे. या प्रवेशामुळे शरद पवार गटाचे ठाण्यातील बालेबंद नेते जितेंद्र आव्हाड यांना मोठा धक्का बसणार आहे. काही दिवसांपूर्वीच आव्हाड यांच्या मतदारसंघातील नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला होता. आता महिलांसह अनेक स्थानिक पदाधिकारी शिंदे यांच्या शिवसेनेत दाखल होणार आहेत.
राजकीय पटलावर सुरू असलेली ही घडामोड केवळ ठाण्यातच नाही, तर राज्याच्या राजकीय समीकरणांवरही परिणाम करणारी ठरणार आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या संघटनेत हळूहळू फट पडताना दिसत आहे. एकनाथ शिंदे यांच्या गटात वाढत चाललेली कार्यकर्त्यांची संख्या आगामी निवडणुकांसाठी महत्त्वाची ठरणार असल्याची चिन्हे आहेत.
दरम्यान, जळगावमध्येही अजित पवार गटाला आज मोठा लाभ झाला. काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षा प्रतिभा शिंदे यांनी अजित पवार गटात प्रवेश करून काँग्रेसला मोठा धक्का दिला आहे. अशा प्रकारे राज्यभरात राजकीय "इनकमिंग-आऊटगोईंग" चा सिलसिला वेगाने सुरू असून, त्याचा थेट परिणाम स्थानिक निवडणुकांवर दिसून येणार हे निश्चित आहे.