शिंदे गटातील नेत्याच्या हॉटेलवर दगडफेक; भाजप नेत्याच्या मुलासह ५० ते ६० जणांविरोधात गुन्हा दाखल
अहमदनगर जिल्ह्यात शिंदे गट आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये राडा होऊ शिंदे गटातील नेत्याच्या हॉटेलवर दगडफेकीची घटना घडली आहे. अहमदनगर शहरातील केडगाव परिसरात भाजपचे माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांच्या मुलामध्ये आणि शिंदे गटाच्या शहर जिल्हाध्यक्षामध्ये वाद झाला.
कर्डिले यांच्या मुलाने शिंदे गटाच्या शहर जिल्हाध्यक्ष दिलीप सातपुते यांच्या हॉटेलची तोडफोड केली. याप्रकरणी पोलिसांनी 50 ते 60 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांचा मुलगा अक्षय कर्डिले याचा सातपुते यांच्याशी किरकोळ कारणावरून वाद झाला. या वादात कर्डिले यांच्या मुलाने कार्यकर्त्यांना घेऊन सातपुते यांच्या हॉटेलवर दगडफेक केली.
दिलीप सातपुते यांचे बंधू विठ्ठल सातपुते यांनी कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली. पोलिसांनी कर्डिले यांच्या मुलासह 50 ते 60 जणांविरोधात गुन्हा दाखल केल्याची माहिती मिळत आहे.