RBL Bank: आरबीएल बँकेची 12 कोटींच्या फसवणूक केल्याप्रकरणी अधिकाऱ्यांसह 11 जणांवर गुन्हा दाखल

RBL Bank: आरबीएल बँकेची 12 कोटींच्या फसवणूक केल्याप्रकरणी अधिकाऱ्यांसह 11 जणांवर गुन्हा दाखल

आरबीएल बँकेच्या दक्षता विभागाच्या तक्रारीवरून गुरूग्राम, मुंबई, राजकोट आणि अहमदाबाद येथील बँकेच्या सात वरिष्ठ अधिकाऱ्यांसह एकूण 11 जणांविरोधात ना. म. जोशी मार्ग पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
Published by :
Dhanshree Shintre

आरबीएल बँकेच्या दक्षता विभागाच्या तक्रारीवरून गुरूग्राम, मुंबई, राजकोट आणि अहमदाबाद येथील बँकेच्या सात वरिष्ठ अधिकाऱ्यांसह एकूण 11 जणांविरोधात ना. म. जोशी मार्ग पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आरोपींनी बँकेची 12 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. आरोपी अधिकाऱ्यांनी त्यांच्या बँकेचे क्रेडिट कार्ड विकण्याच्या बहाण्याने दलालांना अतिरिक्त दलाली दिली. फसवणुकीसाठी आरोपींनी अस्तित्वात नसलेल्या किंवा बनावट दलालांच्या नावाने क्रेडिट कार्ड विकल्याचा आरोप आहे.

आरबीएल बँकेचे सहाय्यक उपाध्यक्ष (दक्षता विभाग) विक्रांत कदम यांच्या तक्रारीवरून ना. म. जोशी मार्ग पोलिसांनी कट रचणे, फसवणूक, बनावट कागदपत्रे तयार करणे, फौजदारी विश्वासघात अशा विविध कलमांतर्गत राष्ट्रीय प्रमख (क्रेडिटकार्ड विभाग, गुरूग्राम) रुधीर सरीन यांच्यासह 10 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहेत. त्यात काही विभागीय अधिकाऱ्यांसह दलालांचा समावेश आहे. क्रेडिटकार्ड विक्रीचे लक्ष्य दिले जाते, ते पूर्ण करण्यासाठी थेट विक्री दलालांची नियुक्ती केली जाते.

प्राथमिक तपासणीत या अधिकाऱ्यांनी दलालांना अतिरिक्त रक्कम दिल्याचे निदर्शनास आले. अधिकाऱ्यांनी त्या बदल्यात दलालांकडून चार कोटी 29 लाख रुपये स्वीकारले, असा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या संपूर्ण गैरप्रकारामुळे आरबीएल बँकेचे 12 कोटी दोन लाख 75 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे याप्रकरणी मुंबई पोलिसांकडे तक्रार करण्यात आली. बँकेने स्वतः तपासणी करून हा गैरव्यवहार उघडकीस आणला आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com