Imtiyaz Jaleel : 'मंत्र्यांच्या सांगण्यावरून गुन्हा दाखल'; इम्तियाज जलील यांचा आरोप
छत्रपती संभाजीनगरात राजकीय वातावरण पुन्हा एकदा ढवळून निघाले आहे. माजी खासदार आणि एमआयएम नेते इम्तियाज जलील यांच्या विरोधात ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. औद्योगिक वसाहतीमधील जमिनीच्या संदर्भात सरकारवर आरोप करताना एका विशिष्ट समाजाविषयी वादग्रस्त विधान केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. क्रांती चौक पोलीस ठाण्यात लक्ष्मण हिवराळे (वय 46, रा. क्रांतिनगर) यांच्या तक्रारीनुसार गुरुवारी रात्री उशीरा हा गुन्हा दाखल करण्यात आला.
मूळ प्रकरणाची पार्श्वभूमी अशी की, इम्तियाज जलील यांनी पत्रकार परिषद घेत पालकमंत्री संजय शिरसाट यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्यांनी शासकीय कागदपत्रे सादर करत संजय शिरसाट यांच्यावर औद्योगिक वसाहतीतील जमिनींबाबत अनियमितता केल्याचा ठपका ठेवला होता. मात्र, त्याच पत्रकार परिषदेदरम्यान एका समाजाविषयी कथितरित्या अवमानकारक वक्तव्य केल्याचे आरोप होत आहेत, ज्यावरून त्यांच्याविरोधात ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेनंतर पत्रकार परिषद घेत इम्तियाज जलील यांनी आपली बाजू मांडली. ते म्हणाले, "मी ज्या शब्दांचा वापर केला ते शब्द सरकारी कागदपत्रांत स्पष्टपणे नमूद आहेत. माझ्यावर फक्त एका मंत्र्याच्या सांगण्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे." त्यांनी हे देखील म्हटले की, "एका कॅबिनेट मंत्र्याला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे विशेष सहकार्य आहे, म्हणूनच पोलीस विभाग त्यांच्याच दबावाखाली काम करत आहे."
जलील यांनी पुढे स्पष्ट केले की, "मी संबंधित पोलिसांविरोधात हायकोर्टात दाद मागणार आहे. मी पोलीस आयुक्त आणि मुख्यमंत्री यांना ट्वीट करून यासंदर्भात माहिती देणार आहे. पोलिसांच्या कार्यशैलीवर शोकसभा व श्रद्धांजली सभा आयोजित करण्यात येणार आहे," असे इम्तियाज जलील यांनी जाहीरपणे सांगितले.
जलील म्हणाले की, "या शहरातील पोलिसांचा मृत्यू झाला आहे. यापुढे 'रेस्ट इन पीस' अशी सोशल मीडियावर मोहीम सुरु करणार आहे." त्यांनी पोलीस प्रशासनावर गंभीर टीका करताना म्हटले की, "हे पोलीस आता गुन्हेगारांच्या दबावाखाली काम करत आहेत. त्यामुळेच माझ्याविरोधात एफआयआर करण्याचा प्रयत्न राज्यभरात केला जात आहे."