OBC Aarakshan : OBC च्या साखळी उपोषणाला सुरुवात; आतापर्यंत कुणाचा पाठिंबा, कुणी दिली आंदोलन स्थळी भेट…
ओबीसी समाजाच्या न्याय हक्कांच्या संरक्षणासाठी आज नागपूरमधील संविधान चौकात साखळी उपोषणाला सुरुवात झाली. ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे यांच्या नेतृत्वाखाली हे उपोषण सुरू झाले असून, भाजपचे आमदार आशिष देशमुख यांनी उपोषणस्थळी भेट देत आंदोलनाला पाठिंबा दर्शवला.
आशिष देशमुख यांनी आंदोलनकर्त्यांना संबोधित करताना ‘‘जो ओबीसी की बात करेगा वही देश पे राज करेगा’’ अशा घोषणा दिल्या. त्याचबरोबर, ओबीसींचे आरक्षण धोक्यात घालण्याच्या कोणत्याही हालचालीला आम्ही ठाम विरोध करू, असं स्पष्ट केलं.
ओबीसी महासंघाने आंदोलनादरम्यान आठवण करून दिली की, ओबीसी समाजाला आरक्षणाचा हक्क सहजासहजी मिळालेला नाही. तब्बल 43 वर्षांच्या अथक संघर्षानंतर 7 ऑगस्ट 1990 रोजी देशातील 60 टक्के लोकसंख्येला प्रतिनिधित्व करणाऱ्या ओबीसी समाजाला 27 टक्के आरक्षणाचा अधिकार मिळाला. हा अधिकार आमच्या पूर्वजांच्या रक्त, घाम आणि संघर्षातून मिळालेला आहे. आता या आरक्षणावर कुणी गदा आणण्याचा किंवा त्यात घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला, तर तो कडाडून हाणून पाडला जाईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.
ओबीसी महासंघाने आपली भूमिका स्पष्ट करताना सांगितलं की, मराठा समाजाला आरक्षण मिळावं याला आमचा विरोध नाही. पण ते आरक्षण ओबीसींच्या कोट्यातून देण्याचा जो प्रयत्न सुरू आहे, त्याला आम्ही ठाम विरोध करतो. ‘‘हा जरांचा बालहट्ट आहे. कोणत्याही परिस्थितीत ओबीसींच्या आरक्षणात तडजोड केली जाणार नाही,’’ असं बबनराव तायवाडे यांनी ठामपणे सांगितलं.
ओबीसी महासंघाने नागपूरपासून या आंदोलनाची सुरुवात केली असून, पुढील काळात हे आंदोलन राज्यभरात तीव्र होणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. ‘‘ओबीसींच्या न्यायहक्कांच्या लढ्यात संपूर्ण समाज एकदिलाने उभा आहे. नागपूरपासून सुरू झालेला हा लढा महाराष्ट्रभर पेटणार असून, कुणाच्याही दबावाखाली आम्ही मागे हटणार नाही,’’ असा इशारा महासंघाने दिला आहे.