Chhatrapati Sambhajinagar : भयंकर ! मुलाचा अर्धनग्न अवस्थेतील मृतदेह पाहून आईचा आक्रोश
छत्रपती संभाजीनगर शहरात शनिवारी सकाळी घडलेल्या एका खळबळजनक घटनेमुळे परिसरात भीतीचं आणि दुःखाचं वातावरण निर्माण झालं. आंबेलोहळ परिसरात एका २८ वर्षीय युवकाचा अर्धनग्न अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. अर्जुन रतन प्रधान असं या युवकाचं नाव असून तो गंभीर गुन्ह्यांमध्ये गुंतलेला होता. अज्ञात इसमांनी त्याची अमानुषपणे हत्या करून मृतदेह निर्जनस्थळी टाकल्याचं प्राथमिक तपासात समोर आलं आहे.
मृतदेहाची माहिती मिळताच परिसरात बघ्यांची गर्दी झाली. काही वेळातच अर्जुनची आई घटनास्थळी धावून आली. मुलाचा चेहरा पाहण्यासाठी तिचा चाललेला आक्रोश काळीज पिळवटून टाकणारा होता. “माझ्या मुलाचा एकदा चेहरा दाखवा”, असं ती पोलिसांना विनवणी करत ओरडत होती. तिच्या या विलापाने अनेकांचे डोळे पाणावले.
अर्जुन रतन प्रधान हा मूळचा कमळापूर परिसरातील असून गेल्या काही महिन्यांपासून आंबेलोहळ भागात एका खासगी कंपनीत काम करत राहत होता. त्याच्यावर वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न, मारहाण, चोरी यांसारख्या अनेक गंभीर गुन्ह्यांचे आरोप होते.
पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज शिंदे यांच्यासह पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. पोलिसांनी काही संशयित व्यक्तींशी चौकशी सुरू केली असून लवकरच मारेकऱ्यांचा शोध घेण्यात येईल, असे सांगितले जात आहे.