Mhada Lotter 2025 : खूशखबर ! बाप्पाच्या आशीर्वादानं होणार घराचं स्वप्न पूर्ण; म्हाडाकडून 5 हजार 285 घरांची सोडत जाहीर
महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाचा (म्हाडा) दरवर्षी हजारो नागरिकंच्या घराचं स्वप्न पूर्ण करते. राज्यातील विविध शहरांमध्ये म्हाडाचे अनेक प्रोजेक्ट सुरू असून नागरिकांना स्वस्त दरात घरं हे अभियान म्हाडा राबवत आहे. आता ठाणेकरांच्या घराचं स्वप्न पूर्ण होणार असून लवकरच म्हाडा ठाणे मंडळातर्फे तब्बल 5 हजारांहून अधिक घरांची लॉटरी काढणार आहे. याबाबतची माहिती आज म्हाडानं जाहिर केली असून कोकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे ठाणे शहर व जिल्हा, वसई (जि. पालघर) येथील विविध गृहनिर्माण योजनेअंतर्गत 5 हजार 285 सदनिका व ओरोस (जि. सिंधुदुर्ग), कुळगाव-बदलापूर येथील 77 भूखंड विक्रीकरिता सोडत जाहीर करण्यात आली आहे. या सोडतीसाठी अर्ज नोंदणी व अर्ज भरणा प्रक्रियेचा शुभारंभ 'गो-लाइव्ह' कार्यक्रमांतर्गत सोमवार 14 जुलै, 2025 रोजी दुपारी 1 वाजता 'म्हाडा'चे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
सोडतीसाठी 13 ऑगस्ट, 2025 रोजी रात्री 11.59 वाजेपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत दिली असून स्वीकृत अर्जांची प्रारूप यादी 21 ऑगस्ट, 2025 रोजी सायंकाळी 6.00 वाजता 'म्हाडा'च्या https://housing.mhada.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाईल. तर सोडतीसाठी स्वीकृत अर्जाची अंतिम यादी दिनांक 1 सप्टेंबर, 2025 रोजी सायंकाळी 6 वाजता 'म्हाडा'च्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार आहे. ऐन गणेशोत्सवाच्या काळात, बाप्पा घरोघरी विराजमान असताना 3 सप्टेंबर, 2025 रोजी सकाळी 10 वाजता पात्र अर्जाची संगणकीय सोडत ठाणे येथील डॉ. काशीनाथ घाणेकर नाट्यगृह येथे जाहीर केली जाणार आहे.