शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासंदर्भात आज सुनावणी होणार
दादर परिसरातील छत्रपती शिवाजी अर्थात शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्यास मुंबई पालिकेने परवानगी नाकारल्याने शिवसेनेने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. तर शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी शिवसेनेच्या याचिकेवर आक्षेप घेतला आहे. त्यानंतर आता शिवाजी पार्कबाबत शिवसेनेने दाखल केलेल्या याचिकेवर आज १२ वाजता सुनावणी होणार आहे.
मुंबई पालिकेने आम्ही दाखल केलेल्या अर्जावर उत्तर दिलं आहे. आम्ही जेव्हा याचिका दाखल केली तोपर्यंत उत्तर दाखल झालं नव्हतं. कायदा आणि सुव्यवस्थाच्या कारणाखाली आमची परवानगी नाकारण्यात आली आहे. त्यामुळे आमच्या याचिकेत सुधारणा करण्याती परवानगी देण्यात यावी. बदल करुन आम्ही नव्या मुद्यावरुन याचिकेत सुधारणा करत कोर्टापुढे येऊ शकतो. असे शिवसेनेच्या वकिवांनी युक्तिवाद केला आहे.
दरम्यान, शिंदे गट आणि ठाकरे गटांने शिवाजी पार्कवर मेळाव्याबाबत बीएमसीकडे परवानगी मागितली होती. पंरतु निर्णय द्यायला महापालिकेने उशीर केल्यानंतर ठाकरे गटाने न्यायालयात धाव घेतली आहे. बीएमसीने नुकतेच शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्याला परवानगी नाकारली आहे. शिवसेनेच्या दसरा मेळाव्याकरिता आपला अर्ज पालिकेकडे गेल्याचा त्यांचा दावा आहे. तर खरी शिवसेना ठाकरे गट असल्यामुळे दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मिळावे असे ठाकरे गटाने याचिकेत म्हटले आहे.