A Historical Record of Japan : तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात आणखी एक ऐतिहासिक विक्रम जपानने आपल्या नावावर केला आहे. जपानच्या राष्ट्रीय माहिती आणि संप्रेषण तंत्रज्ञान संस्था (NICT) आणि सुमितोमो इलेक्ट्रिक इंडस्ट्रीज यांच्या संयुक्त प्रयत्नातून तब्बल 10.20 लाख गिगाबिट्स प्रति सेकंद (Gbps) इतक्या प्रचंड वेगाने इंटरनेट डेटा ट्रान्सफर करण्याचा जागतिक विक्रम प्रस्थापित करण्यात आला आहे. हा वेग इतका प्रचंड आहे की, एका सेकंदात संपूर्ण नेटफ्लिक्स लायब्ररी किंवा सुमारे 10,000 4K चित्रपट सहज डाउनलोड करता येऊ शकतात. तसेच 150 जीबीचा गेम फक्त 3 मिलिसेकंदात डाउनलोड करता येतो.
भारताचा सध्याचा सरासरी ब्रॉडबँड इंटरनेट स्पीड 63.55 एमबीपीएस आहे, जो जपानच्या या नवीन विक्रमाच्या तुलनेत सुमारे 1.6 कोटी पट कमी आहे. अमेरिकेच्या सरासरी इंटरनेट स्पीडच्या तुलनेतही हा वेग 35 लाख पट अधिक आहे.
जपानने याआधी मार्च 2024 मध्ये 402 टेराबिट्स प्रति सेकंद म्हणजेच सुमारे 50,250 गिगाबिट्स प्रति सेकंद गाठत जागतिक विक्रम केला होता. तो विक्रम मानक ऑप्टिकल फायबर केबल्सद्वारे करण्यात आला होता. आता नवीन विक्रमाने त्या गतीचा अनेक पटींनी अधिक वेग गाठला आहे.
हा विक्रम १९-कोर ऑप्टिकल फायबर तंत्रज्ञानाचा वापर करून साध्य करण्यात आला आहे. सर्वसामान्य फायबर केबलमध्ये केवळ एकच कोर असतो, जिथून डेटा एका लेनमध्ये प्रवास करतो. परंतु, या नवीन तंत्रज्ञानात एका केबलमध्ये १९ स्वतंत्र कोर आहेत, म्हणजेच ते १९ लेनच्या हायवेसारखे कार्य करते, जिथून प्रत्येक लेनमध्ये स्वतंत्र डेटा वाहतो. या फायबर केबल्सचा व्यास फक्त ०.१२५ मिमी आहे, म्हणजेच सामान्य फायबरसारखाच आहे, पण कार्यक्षमता अनेक पटींनी अधिक आहे.
इतका वेग मोठ्या अंतरावर टिकवून ठेवण्यासाठी संशोधकांनी विशेष प्रकारचे अॅम्प्लिफायर वापरले आहेत. जेव्हा फायबर केबलमधून डेटा लांब अंतर प्रवास करतो, तेव्हा प्रकाशाच्या स्वरूपात असलेल्या सिग्नलची ताकद कमी होते. अॅम्प्लिफायर हे सिग्नल पुन्हा बळकट करून सुमारे 1,808 किलोमीटर अंतरापर्यंत पोहोचवतात.
सध्या हा वेग प्रयोगशाळेच्या मर्यादेतच आहे. सर्वसामान्य वापरकर्त्यांपर्यंत पोहोचण्यासाठी अद्याप काही वर्षे लागू शकतात. यासाठी तीन मुख्य अडचणी आहेत :
1. उच्च खर्च: इतक्या उच्च स्पीडच्या नेटवर्कसाठी प्रचंड खर्च आवश्यक आहे.
2. हार्डवेअर मर्यादा: सध्याचे राउटर, सर्व्हर आणि नेटवर्क उपकरणे अशा गतीचा डेटा हाताळण्यास सक्षम नाहीत.
3. पायाभूत सुविधांची गरज: विद्यमान फायबर नेटवर्कमध्ये मोठ्या प्रमाणावर सुधारणा करावी लागेल.
यापुढे, क्लाउड गेमिंग, 8K व्हिडिओ स्ट्रीमिंग, व्हर्च्युअल आणि ऑगमेंटेड रिअॅलिटी, स्मार्ट सिटी आणि औद्योगिक ऑटोमेशनसारख्या क्षेत्रांमध्ये ही गती अत्यंत उपयुक्त ठरेल. मात्र, सामान्य ग्राहकांना हा वेग अनुभवण्यासाठी अजून काही काळ वाट पाहावी लागेल. जपानने इंटरनेट स्पीडच्या क्षेत्रात पुन्हा एकदा जागतिक आघाडी घेतली आहे. भारतासारख्या देशांसाठी ही प्रेरणादायी बाब आहे, कारण भारताचा सध्याचा इंटरनेट स्पीड अजूनही जागतिक मानकांपेक्षा खूपच मागे आहे. डिजिटल इंडिया, 5G नेटवर्क आणि ग्रामीण इंटरनेट सुविधा विस्ताराच्या माध्यमातून भारत भविष्यात अशी प्रगती साध्य करू शकतो, अशी अपेक्षा आहे.