Mumbai News
Mumbai News Mumbai News

Mumbai News : फुटपाथवर चालताना महिलेला प्रसूती वेदना, महिला पोलीसच्या धाडसाला सलाम; नेमकं प्रकरण काय?

अचानक प्रसुती वेदनांवर पोलिसांची तत्परता; स्थानिकांच्या सहकार्याने जीव वाचला
Published by :
Riddhi Vanne
Published on

(Dongri) मुंबईच्या डोंगरी परिसरात एका गर्भवती महिलेची अचानक प्रसुती फुटपाथवरच झाली. स्थानिकांनी सांगितल्याप्रमाणे, 36 वर्षीय माला नाडर या महिलेला परिसरातून चालताना अचानक प्रसुती वेदना सुरू झाल्या. वेदना असह्य झाल्याने ती फुटपाथवरच विव्हळत बसली. स्थानिकांनी ताबडतोब डोंगरी पोलीस स्टेशनला माहिती दिली आणि पोलिस घटनास्थळी पोहोचले. पोलीस कर्मचाऱ्यांनी त्वरित मदतीस हजर राहून स्थानिक महिलांच्या साहाय्याने परिस्थिती नियंत्रित केली.

फुटपाथवरच झाली प्रसुती

महिलेला जवळच्या रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न सुरू असताना वेदना वाढल्या आणि तिथेच नवजात बाळाचा जन्म झाला. पोलिसांनी स्थानिक महिलांच्या मदतीने चादर आणि वस्त्रांचा वापर करून तात्काळ सुरक्षित जागा तयार केली. नंतर आई-बाळ दोघेही वस्त्रात गुंडाळून जे. जे. रुग्णालयात हलवण्यात आले. तिथे डॉक्टरांनी बाळाची नाळ कापली आणि तपासणी केली. डॉक्टर्सच्या माहितीनुसार, आई आणि बाळ दोघेही सध्या निरोगी आहेत.

पोलिसांच्या तत्परतेचा गौरव

मुंबई पोलिसांच्या महिला कर्मचाऱ्यांनी या घटनास्थळी दाखवलेल्या तत्परतेचं सोशल मीडियावर कौतुक होत आहे. डोंगरी पोलीस स्टेशनच्या एका पोस्टमध्ये म्हटले आहे: "डोंगरी परिसरातील उमरखाडी येथे एका महिलेला फुटपाथवर प्रसुती वेदना सुरू झाल्याचे समजल्यावर पोलिस ताबडतोब घटनास्थळी पोहोचले. स्थानिक महिलांच्या मदतीने सुरक्षितपणे महिला आणि नवजात बाळाला जे. जे. रुग्णालयात नेण्यात आले. आई-बाळ दोघांची प्रकृती आता चांगली आहे."*

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com