Mumbai Worli Sea Link Accident : मुंबईतील वरळी सी-लिंकवर भीषण अपघात! भरधाव गाडीने पोलीस हवालदाराला जागीच चिरडले, तरमहिला पोलीस
मुंबईत आज सकाळी वरळी सी-लिंक परिसरात भीषण अपघात घडला. कोस्टल रोड आणि वरळी सी-लिंकला जोडणाऱ्या ठिकाणी घडलेल्या या दुर्घटनेत एका पोलीस हवालदाराचा मृत्यू झाला असून एका महिला पोलीस कर्मचाऱ्याला गंभीर दुखापत झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, घटनास्थळी काही पोलीस अधिकारी आणि कर्मचारी व्हीआयपी बंदोबस्तासाठी तैनात होते. त्याचवेळी भरधाव वेगाने धावणाऱ्या एका कारने नियंत्रण सुटून पोलिसांना धडक दिली. यात वरळी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले हवालदार दत्तात्रय कुंभार गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने जवळच्या वोकहार्ट रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, उपचार सुरू होण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.
अपघातात जखमी झालेल्या महिला पोलीस कर्मचाऱ्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, पोलिसांनी अपघात घडवणाऱ्या वाहनचालकाला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.