Nashik-Mumbai Highway Accident : नाशिक-मुंबई महामार्गावर भीषण अपघात! बस चालकाचं नियंत्रण सुटलं अन्...15 ते 20 प्रवासी
मुंबई–नाशिक महामार्गावर सोमवारी (15 सप्टेंबर) सायंकाळी 4:45 वाजता इगतपुरीजवळ भीषण अपघात झाला. चाळीसगावहून पनवेलकडे जाणारी खाजगी बस (क्र. MH.GT.6563) रायगडनगर परिसरात नियंत्रण सुटल्याने समोर असलेल्या वाहनाला मागून जोरदार धडकली. या अपघातात बसमधील 40 ते 45 प्रवाशांपैकी 15 ते 20 प्रवासी जखमी झाले असून त्यांच्यावर नाशिक सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
जखमींमध्ये रमा गावडे (77), फकीरा परदेशी (76), शोभाबाई खैरे (75), सुमनबाई कोष्टी (65), बारकू पाटील (52), मुंब्रा कोष्टी (75), देवकाबाई कवडे (55), विमलबाई पाटील (71), शिवाजी चव्हाण (61), अरुणाबाई चव्हाण (46) यांचा समावेश आहे. बस चालक संतोष विलास देशमुख यालाही दुखापत झाली आहे. अनेक प्रवाशांना किरकोळ दुखापत झाल्याने त्यांना स्थानिक रुग्णालयात प्राथमिक उपचार देण्यात आले.
अपघातानंतर महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्य संस्थानच्या मोफत रुग्णवाहिका सेवेमुळे जखमींना तातडीने हॉस्पिटलमध्ये पोहोचवण्यात आले. स्थानिक नागरिकांनीही मोठ्या प्रमाणात मदतकार्य केले. अपघातामुळे महामार्गावर काही काळ वाहतूक ठप्प झाली होती.
पोलिसांच्या माहितीनुसार, बस चालकाचे नियंत्रण अचानक सुटल्यामुळे ही धडक झाली. अपघाताचा तपास सुरू असून, महामार्गावर वाहनचालकांच्या सुरक्षिततेसाठी अधिक कठोर उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.