Uttarakhand Cloudburst : उत्तराखंडमध्ये ढगफुटीचा कहर; पुण्यातील 19 पर्यटक बेपत्ता
Uttarakhand Cloudburst: Maharashtra Tourists Trapped, know details उत्तराखंडमधील उत्तरकाशी जिल्ह्यातील धारली गावाजवळ 5 ऑगस्ट रोजी भीषण ढगफुटी झाली. या नैसर्गिक आपत्तीत काही ठिकाणी मृत्यूची नोंद झाली असून अनेकजण बेपत्ता आहेत. ढगफुटीनंतर निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीमुळे मोठ्या प्रमाणावर जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक पर्यटक आणि स्थानिक रहिवासी सध्या त्या भागात अडकले असून, बचावकार्य सुरू आहे.
महाराष्ट्रातून गेलेले अनेक पर्यटक सध्या त्या भागात अडकल्याची माहिती समोर येत आहे. विशेषतः पुणे, सोलापूर आणि नांदेड येथील नागरिक या दुर्घटनेच्या वेळी त्या भागात उपस्थित होते. त्यातच पुण्यातील आंबेगाव तालुक्यातील अवसरी खुर्द येथील 1990च्या दहावी बॅचमधील 19 जणांचा एक गट 1 ऑगस्ट रोजी उत्तराखंडला पर्यटनासाठी रवाना झाला होता. या गटात 8 पुरुष आणि 11 महिलांचा समावेश आहे. या पर्यटकांचा शेवटचा संपर्क गंगोत्री परिसरातून झाला होता. सकाळी काही सदस्यांनी फोटो आणि स्टेटस शेअर केल्याचे नोंदवले गेले होते, परंतु त्यानंतर संपर्क तुटलेला आहे. काल या गटातील एका महिलेनं तिच्या मुलाशी फोनवर संपर्क साधून सर्वजण सुखरूप असल्याची माहिती दिली होती. मात्र, त्यानंतर कुठलाही संपर्क होऊ शकलेला नाही.
सोलापूर येथून गेलेले चार तरुणही सध्या गंगोत्री परिसरात अडकल्याचे समजते. विठ्ठल पुजारी, समर्थ दसरे, धनराज बगले आणि मल्हारी धोटे अशी या तरुणांची नावे आहेत. सकाळी 11 वाजेपर्यंत त्यांनी कुटुंबीयांशी संपर्क साधून आपली सुरक्षितता सांगितली होती. पण त्यानंतर त्यांचाही संपर्क तुटला आहे. सोलापूर जिल्हा प्रशासन उत्तराखंड प्रशासनाशी समन्वय साधून माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. एनडीआरएफने दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार सध्या तरी कोणतीही जीवितहानी सोलापूरच्या व्यक्तींबाबत नोंदवलेली नाही दरम्यान, नांदेड जिल्ह्यातील 11 पर्यटक उत्तरकाशीमधील खराडी गावात सुरक्षित असल्याची माहिती मिळाली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संपर्क कार्यालयाने याबाबत थेट संवाद साधला असून, पर्यटकांच्या नातेवाईकांनी दिलासा मिळाला आहे.