Chhatrapati Sambhajinagar : साखरपुड्यावरुन परतणाऱ्या कुटुंबावर काळाने घाला घातला! ; चिमुरडा गंभीर तर वधूला...
A shocking incident has come to light in Chhatrapati Sambhajinagar where a family returning home after celebrating Sakharpuda : साखरपुडा उरकून घरी परतणाऱ्या कुटुंबावर रात्रीच्या सुमारास घाटात कोयत्यांनी आणि तलवारींनी भीषण हल्ला केल्याची धक्कादायक घटना छत्रपती संभाजीनगरात उघडकीस आली आहे. या हल्ल्यात चार वर्षांचा चिमुकला गंभीर जखमी झाला असून, नियोजित वधूला तीन अज्ञात व्यक्तींनी कारने जबरदस्तीने पळवून नेल्याचा आरोप करण्यात आला आहे. ही घटना रविवारी रात्री उशिरा वेरूळ घाटात घडली. मोहाडी उपनगरातील एक कुटुंब मुलाच्या साखरपुड्यासाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये आले होते. साखरपुडा पार पडल्यानंतर, नववधूसह संपूर्ण कुटुंब कारने परत जात असताना घाटात ही हल्ल्याची घटना घडली.
वाहन घाटात पोहचताच, तीन अज्ञात हल्लेखोरांनी तलवार आणि कोयत्यांसह कारवर जोरदार हल्ला चढवला. गाडीत बसलेल्या व्यक्तींना मारहाण करत जखमी केले आणि नियोजित वधूला गाडीत बसवून पळवून नेले. या हल्ल्यात पियुष बटू पाटील (वय ४ वर्षे) हा चिमुकला गंभीर जखमी झाला असून, कैलास कृष्णा शिंदे हे देखील जखमी झाले आहेत. हल्ल्यानंतर घडलेल्या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. हल्ला झाल्यानंतर पीडितांनी खुलताबाद पोलीस ठाण्यात धाव घेतली असून, अद्याप अधिकृत गुन्हा दाखल झाल्याची माहिती नाही.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना पूर्ववैमनस्यातून घडली असावी, असा संशय व्यक्त करण्यात येत आहे. हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी पोलीसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली आहे. या गंभीर घटनेमुळे छत्रपती संभाजीनगर व परिसरात खळबळ उडाली असून, सुरक्षिततेबाबत नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे.