Wardha Crime : वर्ध्यात धक्कादायक घटना; 28 वर्षीय युवकाकडून वृद्ध महिलेवर अत्याचार
वर्धा जिल्ह्यातील देवळी तालुक्यातील वायगाव येथे मानवीतेला काळीमा फासणारी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथील एका 28 वर्षीय युवकाने वृद्ध महिलेवर अत्याचार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गावातीलच राहणाऱ्या 60 वर्षीय वृद्ध महिलेवर आरोपी युवकाने जबरदस्तीने अत्याचार केला. या घटनेनंतर पीडित महिलेने धीर एकवटून देवळी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा नोंदवून आरोपीविरुद्ध बलात्कार व इतर संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
घटनेनंतर परिसरात प्रचंड संतापाची लाट पसरली आहे. गावकऱ्यांनी हा प्रकार ऐकून तीव्र नाराजी व्यक्त केली असून, आरोपीला कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी होत आहे. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेत पुढील तपास सुरू केला आहे. देवळी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी युवक आणि वृद्ध महिला एकाच गावात राहत होते. आरोपीने महिलेचा गैरफायदा घेत अत्याचार केला. हा प्रकार घडल्यानंतर पीडित महिला मानसिक धक्क्यात असून, तिच्या जबाबाच्या आधारे पोलिसांनी तत्काळ कारवाई केली आहे.
दरम्यान, अशा घटनांमुळे महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. विशेषतः ग्रामीण भागात अशा प्रकारच्या घटनांना आळा बसावा यासाठी समाजाने पुढे येऊन जागरूकता निर्माण करणे आवश्यक असल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले आहे.