Jalgaon News : जन्मदात्या पित्याने घेतला मुलाचा जीव; पोलिसांनी आठ तासांत प्रकरणाचा उलगडा
Jalgaon Crime News : जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील कसबा पिंपरी गावात एक धक्कादायक घटना घडली आहे. सततच्या वादांना कंटाळून वडिलांनी केला आपल्या मुलाचा खून. या गुन्ह्यात पित्याला भावाने आणि दुसऱ्या मुलाने मदत केल्याचे उघड झाले असून, पोलिसांनी अवघ्या आठ तासांत या खुनाचा तपास लावला. मृत युवकाचे नाव शुभम सुरडकर (वय अंदाजे २५) असून, आरोपी वडिलांचे नाव धनराज सुरडकर आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शुभमला दारूचे अतिव्यसन होते. सततच्या वादामुळे त्याची पत्नी काही दिवसांपूर्वी माहेरी गेली होती. त्यानंतर शुभम दारूच्या नशेत घरच्यांशी रोज भांडण करत असे, त्यामुळे कुटुंबीय मानसिक तणावात होते.
शेवटी या रोजच्या वादाला कंटाळून वडिलांनी शुभमच्या डोक्यात दगड घालून त्याचा खून केला. नंतर या घटनेला अज्ञात व्यक्तीने हत्या केल्याचा आभास निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मृतदेहाची विल्हेवाट लावण्यात आली आणि पोलिसांना दिशाभूल करणारा बनाव तयार करण्यात आला.
तथापि, फत्तेपूर पोलिसांनी केवळ 8 तासांत या प्रकरणाचा छडा लावला आणि खऱ्या गुन्हेगारांपर्यंत पोहोचले. पोलिसांनी धनराज सुरडकर, त्यांचा भाऊ हिरालाल आणि लहान मुलगा गौरव या तिघांना अटक केली असून, फत्तेपूर पोलीस ठाण्यात त्यांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.