Pakistan Railway Accident : पाकिस्तानच्या जकोकाबादमध्ये जाफर एक्सप्रेसमध्ये स्फोट; एक्सप्रेसचे 4 डब्बे रुळावरुन घसरले
पाकिस्तानमधील सिंध प्रांतातील जकोबाबाद येथे आज (18 जून) सकाळी जाफर एक्सप्रेसमध्ये स्फोट झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या स्फोटामुळे जाफर एक्सप्रेसचे चार डबे रुळावरून घसरले असून, घटनेमुळे परिसरात एकच खळबळ माजली आहे. ही एक्सप्रेस पेशावरहून क्वेट्याकडे निघाली होती. घटनास्थळी आपत्कालीन पथके दाखल झाली असून, बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.
स्थानिक प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, स्फोटाचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नसले तरी हा स्फोट घातपाताचा असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. घटनास्थळी तपास यंत्रणांनी पोहोचून चौकशी सुरू केली आहे. काही अपघातग्रस्त प्रवाशांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, जखमींची संख्या वाढण्याची शक्यता आहे. या घटनेनंतर पाकिस्तानच्या रेल्वे मंत्रालयाने तातडीने चौकशीचे आदेश दिले आहेत. तसेच देशभरातील महत्वाच्या रेल्वेमार्गांवर अतिरिक्त सुरक्षा पथके तैनात करण्यात आली आहेत.
सध्या जाफर एक्सप्रेसची सेवा तात्पुरती स्थगित करण्यात आली असून, या मार्गावरून जाणाऱ्या अन्य गाड्यांनाही वळविण्यात आले आहे. स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी गर्दी करू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.