CM Devendra Fadnavis : मराठा समाजाचा हिताचा तोडगा निघाला, फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
CM Devendra Fadnavis On Manoj Jarange Maratha Protest : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणाला बसलेले मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी अखेर आपलं आंदोलन मागे घेतलं आहे. राज्य सरकारकडून मागण्या मान्य झाल्यानंतर जरांगे यांनी उपोषण सोडलं असून यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी मंत्रिमंडळ उपसमितीचं विशेष अभिनंदन करत सरकारनं केलेल्या प्रयत्नांची माहिती दिली.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, "मनोज जरांगे यांचं आदोलन त्यांनी मागे घेतलं आहे. खरं म्हणजे हैदराबाद लागू करण्याकरता आमची सुरुवातीपासून तयारी होती. पण त्यातील महत्त्वाचा विषय होता की, मनोज जरांगे यांची सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावे, अशी मागणी होती. त्यामध्ये कायदेशीर अडचणी होत्या. हायकोर्टाचे आणि सुप्रीम कोर्टाचे निर्णय पाहता अशाप्रकारे सरसकट करणं शक्य नव्हतं."
ते पुढे म्हणाले, "विशेषतः आपण लक्षात घेतलं पाहिजे की, ही वस्तुस्थिती त्यांच्याही लक्षात आणून देण्यात आली. मंत्रिमंडळ उपसमितीच्या टीमने त्यांच्याही लक्षात आणून दिलं. आपल्या कायद्याप्रमाणे आणि देशाच्या संविधानाप्रमाणे आरक्षण हे समुहाला नसतं तर व्यक्तीला असतं. त्या व्यक्तीने ते क्लेम करायचं असतं. म्हणूनच अशाप्रकारे सरसकट करता येणार नाही. ते कायद्याच्या पातळीवर टिकणार नाही. त्यांनीदेखील काल ती भूमिका समजून घेतली आणि स्वीकारली."
फडणवीस यांनी स्पष्ट केलं की, "त्यांनी सांगितलं की, कायद्यात सरसकट बसत नसेल तर सरसकट करु नका. त्यातून हा स्टेलमेंट मागे झाला. पुन्हा त्याबाबत मंत्रिमंडळ उपसमितीने चर्चा केल्या. जीआर काढला. त्यामध्ये जे बदल हवे होते ते केले. तो जीआरदेखील जाहीर झाला आहे. त्यासोबतच इतर मागण्या होत्या. त्या सगळ्या मागण्या मंत्रिमंडळ उपसमितीने मान्य केल्या आहेत."
मुख्यमंत्री म्हणाले, "मला पहिल्यांदा मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष आणि समितीमधील मंत्र्यांचं अभिनंदन करायचं आहे. त्यांनी सातत्याने बैठका घेऊन चर्चा करुन मार्ग काढला आहे. हा मार्ग निघाल्यामुळे मराठवाड्यात राहणाऱ्या आमच्या मराठा समाजाच्या लोकांना, ह्यांना कधीकाळी रक्तनात्यातील लोकांचा कुणबी म्हणून उल्लेख असेल तर त्यांना कुणबी जात प्रमाणपत्र मिळणार आहे. हैदराबाद गॅझेटियरमुळे ते सोपं होणार आहे. फॅमिली ट्री इस्टॅब्लिश करुन आरक्षण दिलं जाणार आहे. ज्यांना अशाप्रकारचे पुरावे मिळेल ते सगळ्यांना आरक्षण मिळेल."
फडणवीस यांनी सरकारच्या पूर्वीच्या निर्णयांचा उल्लेख करताना सांगितलं, "आमच्या सरकारने मराठा समाजासाठी जे कार्य केलं आहे ते सर्वांना माहिती आहे. विशेषतः मराठा समाजाला आरक्षण देणारं आमचं सरकार आहे. मागच्या काळात मी मुख्यमंत्री असताना, त्यानंतर शिवसेनेचे मुख्य नेता एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना, मराठा समाजाला 10 टक्के आरक्षण दिलं आहे. ते आरक्षण सुरु आहे. आपण अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून दीड लाख मराठा उद्योजक तयार केले आहेत."
शेवटी फडणवीस यांनी आश्वासन दिलं की, "महाराष्ट्र सरकारने मराठा समाजाकरता खूप मोठ्या प्रमाणात काम केलं आहे. पुढेही आम्ही काम करणार आहोत. त्यामुळे या संदर्भात कुणाच्याही मनात शंका असण्याचं कारण नाही. पण लोकशाही मार्गाने कुणी आंदोलन करत असेल तर त्यांच्याही मागण्या समजून घेऊ."