Crime In Pune : कात्रजमध्ये जागेच्या व्यवहारावरून तरुणावर वार; आरोपी फरार

Crime In Pune : कात्रजमध्ये जागेच्या व्यवहारावरून तरुणावर वार; आरोपी फरार

कात्रजमधील संतोषनगर परिसरात रविवारी पहाटे जागेच्या वादातून एका तरुणाचा निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
Published by :
Team Lokshahi
Published on

कात्रजमधील संतोषनगर परिसरात रविवारी पहाटे जागेच्या वादातून एका तरुणाचा निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून, स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मृत तरुणाचे नाव शुभम सुभाष चव्हाण (वय अंदाजे 28) असे असून, अमर साकोरे आणि त्याचे दोन साथीदार आरोपी असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास कात्रजमधील संतोषनगरमध्ये शुभम चव्हाण हा घरी जात होता. त्यावेळी अमर साकोरे आणि इतर दोघांनी त्याला थांबवत जागेच्या व्यवहाराबाबत विचारणा केली. या प्रश्नांवरून त्यांच्यात वाद झाला आणि शुभम तिथून पळून जाण्याचा प्रयत्न करू लागला. त्यावेळी आरोपी अमर साकोरे आणि दोघा साथीदारांनी त्याचा पाठलाग करत लाकडी बांबू, काठी, दगड आणि विटांचा वापर करून त्याच्यावर बेदम हल्ला केला. या मारहाणीत शुभमच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि त्याचा मृत्यू झाला. घटना घडल्यानंतर तिन्ही आरोपी घटनास्थळावरून फरार झाले आहेत.

या प्रकरणातील तिन्ही आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी शोधपथक तयार केले असून, ही हत्या जागेच्या वादातून झाल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे. "शुभमच्या जाण्याने आमच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. कोणीतरी त्याला इतक्या क्रूरपणे मारेल, असं कधीच वाटलं नव्हतं," अशी भावनिक प्रतिक्रिया शुभमच्या कुटुंबीयांनी व्यक्त केली आहे.

आंबेगाव पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली आहे. लवकरच आरोपींना अटक करण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण असून, पोलिसांनी नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com