Haryana Man killed in California : डंकी स्टाईलने प्रवेश, अटकेतून सुटल्यानंतर..., कॅलिफोर्नियात भारतीय तरुणाची गोळी झाडून हत्या; कपिलसोबत नेमकं काय घडलं?
अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये हरियाणातील जिंद जिल्ह्याचा एक युवक गोळीबारात ठार झाला. सार्वजनिक ठिकाणी लघुशंकेला विरोध केल्याने हा वाद निर्माण झाला आणि त्याचा शेवट दुर्दैवी हत्येत झाला. मृतकाची ओळख कपिल अशी असून तो सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होता.
कपिल हा हरियाणातील बरा खालन गावातील रहिवासी आणि शेतकरी कुटुंबातील एकुलता एक मुलगा होता. दोन अडीच वर्षांपूर्वी तो अमेरिकेत गेला होता. 2022 मध्ये त्याने डंकी रूट वापरून पनामा जंगल आणि मेक्सिको सीमेवरील भिंत ओलांडून अमेरिकेत प्रवेश केला होता. या प्रवासासाठी त्याच्या कुटुंबाने तब्बल 45 लाख रुपये खर्च केले होते. सुरुवातीला अटक झाल्यानंतर कायदेशीर प्रक्रियेतून सुटल्यानंतर तो तेथे स्थायिक झाला होता.
या घटनेची माहिती अमेरिकेत राहणाऱ्या एका नातलगाने कुटुंबीयांना दिली. कपिलच्या दोन बहिणी असून त्यापैकी एक विवाहित आहे. अचानक घडलेल्या या घटनेमुळे कुटुंबीय तसेच गावकरी पूर्णपणे हतबल झाले आहेत. गावातील सरपंचांनी सांगितले की, गावकऱ्यांचा संपूर्ण पाठिंबा कुटुंबाला असून दुःखाच्या या प्रसंगी सर्वजण एकत्र उभे आहेत.
कपिलचा मृतदेह भारतात आणण्यासाठी कुटुंबीय लवकरच प्रशासनाकडे मागणी करणार आहेत. त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना भेटण्याची तयारी सुरू असून कुटुंबीयांना सरकारकडून आवश्यक ती मदत मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.